नवी दिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिला आठवडा गोंधळात गेला असला तरी दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत सुरु आहे. आजही संसदेत अनेक विषयांवर चर्चा झाली. संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी सकाळी विरोधी पक्षांनी अदानी प्रश्नावरुन चर्चेची मागणी केली. यावेळी संसदेच्या परिसरात काँग्रेस, राजद, शिवसेना उबाठा, डीएमके व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या खासदारांनी जोरदार निर्दशने केली.
लोकसभेत आज नोंदणीकृत पत्रकार व ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वेतील सवलतीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देतांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकारकडून सर्वच रेल्वे तिकीटावर ४६ टक्के सवलत दिली जाते. या पोटी सरकारने ५६,९९३ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे वेगळी सवलत देता येणार नाही. मथुरेच्या खासदार हेमामालिनी यांनी आज लोकसभेत बांगला देशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी पियुष गोयल यांना उद्देशून सांगितले की, ज्या सदस्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ नये. अखिलेश यादव यांना उद्देशून केलेल्या या टिप्पणीमुळे काही काळ लोकसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
राज्यसभेत काही काळ काल दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा गाजला. राज्यसभा अध्यक्ष जनदीप धनखड यांनी त्यावेळी विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे,असा टोला धनखड यांनी लगावला. भारत चीन सीमेवरील स्थितीबाबात काल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत निवेदन दिले होते . त्यांनी राज्यसभेतही आज ते निवेदन दिले. भारत चीन यांच्यातील संबंध सुधारत असून सीमेवर शांतता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







