नवी मुंबई- आता नवी मुंबई परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनाही मार्च महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. एप्रिलचा अर्धा महिना उलटून गेला तरी पगार हाती न पडल्याने दैनंदिन खर्चासहित विविध कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न या कर्मचार्यांपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे प्रशासनाने मात्र मार्च अखेरमुळे पगार रखडल्याचे कारण पुढे केले आहे.
नवी मुंबई परिवहन प्रशासनाने निदान ज्यांना कमी पगार आहे, त्याचप्रमाणे तृतीय व चतुर्थ श्रेणी आणि कंत्राटी काम करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांना तरी वेळेवर पगार देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी हे कर्मचारी करीत आहेत. नवी मुंबई परिवहन सेवेत ३ हजार कर्मचारी, अधिकारी काम करतात. पालिकेकडून या उपक्रमासाठी दरवर्षी २५० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. या परिवहन सेवेत १८ ते २५ हजार महिना पगारावर कंत्राटी वाहनचालक आणि कर्मचारी काम करत आहेत. परिवहन उपक्रमाने २०२५-२६ चा तब्बल ५३४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात वार्षिक २५० कोटींचे अनुदान पालिका दरवर्षी देत असते. एवढी उलाढाल असूनही परिवहन प्रशासनाने हे पगार रखडण्यामागे मार्च अखेरचे कारण पुढे केले आहे.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







