मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे कोकण विभागाने सर्वोच्च निकाल देत आपली परंपरा कायम राखली आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलींनी यंदाही मुलांपेक्षा चांगला निकाल लावून बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान पार पडली होती. परीक्षेसाठी 10,550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून नोंदणी झाली होती आणि राज्यभरात 3,373 परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली होती. यंदा राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, मागील वर्षाच्या 93.37 टक्क्यांच्या तुलनेत निकालात 1.49 टक्क्यांची टक्क्यांच्या तुलनेत निकालात 1.49 टक्क्यांची घट झाली आहे. राज्यातील एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागनिहाय निकाल पाहता कोकण विभागाने 96.74 टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 89.46 टक्के लागला आहे. याशिवाय कोल्हापूर 93.64%, मुंबई 92.93%, छत्रपती संभाजीनगर 92.24%, अमरावती 91.43%, नाशिक 91.314%, पुणे 91.32%, आणि नागपूर 90.52% निकाल लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षाही मुलींचा निकाल जास्त चांगला लागला आहे. मुलींचा निकाल 94.58 टक्के तर मुलांचा निकाल 89.51 टक्के लागला आहे. परीक्षेसाठी 8 लाख 10 हजार 348 मुले, 6 लाख 94 हजार 652 मुली आणि 37 तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गुणांच्या श्रेणीनुसार यशाची आकडेवारी लक्षवेधी आहे. 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी 1,49,932 आहेत, फर्स्ट क्लास (60% ते 74.99%) मिळवणाऱ्यांची संख्या 4,07,438 आहे, द्वितीय श्रेणी (45% ते 59.99%)मध्ये 5,80,902 विद्यार्थी आणि 35% ते 44.99% गुण मिळवलेले 1,64,601 विद्यार्थी आहेत. यंदा परीक्षेतील 154 विषयांपैकी 37 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यंदा कॉपीविरोधी कडक मोहीम राबवण्यात आल्यामुळे निकालात थोडी घट झाली.
वैभवी देशमुखला 85 टक्क्यांचे घवघवीत यश
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला बारावीला 85.33 टक्के मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडसह राज्यात मोठे मोर्चे निघाले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतरच्या या मोर्चात त्यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सहभागी होते. वडिलांच्या या निर्घृण हत्येचे दु:ख मनात ठेवून वैभवीने बारावीची परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.
बारावीत कमी गुण
विद्यार्थ्याची आत्महत्या
राज्यात आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. परंतु या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे पाचोरा येथे भावेश महाजन (19) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुट्टी असल्याने भावेश पाचोरा तालुक्यातील देशमुख वाडी येथे बहिणीच्या घरी राहायला आला होता. दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर त्याला 42 टक्के मिळाल्याचे समजले. कमी गुण मिळाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले.
