ऑपरेशन सिंदूरचा जगभर सरकारी प्रचार! शशी थरूर, सुळेंच्या नेमणुकीने खळबळ

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईबाबत भारताच्या भूमिकेचा जगभर जाऊन प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय खासदारांची सात शिष्टमंडळे गठीत केली आहेत. या शिष्टमंडळांत काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या सुप्रिया सुळे आहेत. यामुळे राजकीय खळबळ माजली आहे.
काँग्रेसने या शिष्टमंडळासाठी शशी थरूर यांचे नावच दिले नव्हते. मात्र शशी थरूर हे सध्या सातत्याने मोदींची प्रशंसा करतात. त्यामुळे ते योग्य वेळी काँग्रेसची साथ सोडून भाजपात जातील अशी चर्चा आहे. या स्थितीत काँग्रेसने अधिकृतपणे शिष्टमंडळासाठी दिलेले नाव डावलून थरूर यांना शिष्टमंडळात घेतले आहे. इकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येतील अशी स्पष्ट चिन्ह आहेत. हे घडले तर संपूर्ण राष्ट्रवादी मोदींना पाठिंबा देईल हे उघड आहे. त्याच मार्गाने पुढचे पाऊल टाकत केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे यांना घेऊन त्यांना नेतृत्व दिले आहे. त्या आता परदेशात जाऊन मोदी सरकारने केलेल्या कारवाईचे कौतुक करीत भारताची बाजू मांडतील. पंतप्रधान मोदींनी एकाच खेळीत अनेकांना शह दिला आहे. सुप्रिया सुळे यांना सरकारी शिष्टमंडळात घेणे म्हणजेच मविआचा शेवट नजीक आल्याचे सूतोवाच आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. याशिवाय दोन दिवसांनी पुन्हा हवाई हल्ले करून पाकिस्तानच्या नऊ हवाई तळांचे नुकसान केले. यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी झाली. मात्र, पाकिस्तानकडून भारतावर सतत आरोप केले जात आहेत. पाकिस्तान खोटे दावेही करीत आहे. त्यामुळे भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची खरी माहिती जगभरात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय 7 शिष्टमंडळे महत्त्वाच्या देशांत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांची 7 शिष्टमंडळे परदेशी जाणार असून, प्रत्येक शिष्टमंडळात 5 खासदार असतील. प्रत्येक शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार, याची नावेही आज जाहीर करण्यात आली. या शिष्टमंडळात भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा यांच्यासह काँग्रेसचे शशी थरूर, जदयूचे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोळी करुणानिधी, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे आणि शिवसेना (शिंदे गट)चे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. खासदारांचे शिष्टमंडळे या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देतील.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर करताना आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, भारत एकजुटीने उभा आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे भारताच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा संदेश जगातील प्रमुख देशांपर्यंत पोहोचवतील. हे राजकारणाच्या, मतभेदांच्या पलीकडे असलेल्या राष्ट्रीय एकतेचे एक शक्तिशाली प्रतिबिंब आहे.
या शिष्टमंडळांत माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि ओडिशाच्या भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांचा समावेश आहे. काँग्रेसचे शशी थरूर, मनीष तिवारी, सलमान खुर्शीद आणि अमर सिंग यांच्याशीही संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे. सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस), सस्मित पात्रा (बिजद), के कनिमोझी (द्रमुक), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना उद्धव ठाकरे) जॉन ब्रिटास (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) आणि असदुद्दीन ओवेसी (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) यांनादेखील निमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, भारताची बाजू मांडायला विदेशात जाणाऱ्या खासदारांच्या टीममध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मी स्वीकारले आहे. पंतप्रधान मोदींनी स्थापन केलेल्या खासदारांची टीम ऑपरेशन सिंदूरबाबत जगासमोर भारताची बाजू मांडतील. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संसदीय कार्यमंत्री किरन रिजिजू यांचे आभार मानते. जेव्हा आपल्या देशाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र असतो, हेच यातून दिसेल. खासदारांच्या प्रत्येक पथकात 5 सदस्य असतील. ते सुमारे 10 दिवसांच्या दौऱ्यावर 5 ते 8 देशांत जातील. 23 किंवा 24 मे रोजी शिष्टमंडळ निघण्याची शक्यता आहे.
शशी थरूर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, पाच प्रमुख देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारने मला आमंत्रित केल्याबद्दल सन्मान वाटतो. राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या मदतीची आवश्यकता असते, तेव्हा मी कदापि मागे राहणार नाही.
थरूर यांच्या निवडीवर काँग्रेसने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडेच ऑपरेशन सिंदूर मोदी यांची प्रशंसा केल्याबद्दल काँग्रेसने थरुर यांच्यावर टीका केली होती. थरूर यांनी लक्ष्मण रेखा ओलांडली आहे, असे काँग्रेसच्या खासदारांनी म्हटले होते. आता मोदी सरकारने थरूर यांच्याकडे शिष्टमंडळांचे नेतृत्व सोपवून काँग्रेसला पुन्हा डिवचले आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश म्हणाले की, केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांनी 16 मे रोजी सकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. पाकिस्तानविरोधी दहशतवादावर भारताची भूमिका मांडण्यासाठी विदेशात जाणाऱ्या प्रतिनिधी मंडळासाठी चार नावे सुचवावी, अशी विनंती त्यांनी केली. 16 मे रोजी दुपारपर्यंत राहुल गांधी यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना पत्र लिहून काँग्रेसकडून आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सैयद नसीर हुसैन आणि राजा बरार यांची नावे पाठवली होती. पण केंद्र सरकारने या चारही नावांना डावलून शशी थरूर यांच्या नावाचा प्रतिनिधी मंडळात समावेश केला आहे.
कोण कुठे जाणार?
सात शिष्टमंडळांमध्ये शशी थरुर अमेरिकेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करणार आहेत. रवि शंकर प्रसाद यांचे शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहारिन, अल्जेरिया येथे जाईल. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओमान, केनिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्तला जाणाऱ्या शिष्टमंडळांची जबाबदारी असेल. संजय झा हे जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया या देशांत शिष्टमंडळ घेऊन जातील.