इस्रोचे ऐतिहासिक 101वे प्रक्षेपण! तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी ठरले


श्रीहरिकोटा-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज पहाटे श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही-सी 61 द्वारे ईओएस-09 या आपल्या 101व्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. मात्र हे ऐतिहासिक 101 वे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही. तांत्रिक अडचणीमुळे ही महत्त्वाची मोहीम अपयशी ठरली.
देशाच्या सीमाभागातील घुसखोरी आणि संशयित हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने हा उपग्रह विकसित करण्यात आला होता. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादविरोधी कारवाया रोखण्यासाठी हा उपग्रह अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार होता. पहाटे 5.59 मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. प्रक्षेपणाबद्दल माहिती देताना इस्त्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, उपग्रह प्रक्षेपणाचा आमचा हा 101वा प्रयत्न होता. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यापर्यंत पीएसएलव्हीने आपली कामगिरी सुरळीतपणे पार पाडली. मात्र तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक त्रुटीमुळे मोहीम पूर्ण होऊ शकली नाही.
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ मनीष पुरोहित यांनी म्हटले की, पीएसएलव्ही हे संपूर्ण भारतीय बनावटीचे रॉकेट आहे. या रॉकेटचे हे 63 वे उड्डाण होते. तर पीएसएलव्ही- एक्सएल तंत्रज्ञान वापरून केलेले हे 27 वे उड्डाण होते. या रॉकेटसोबत प्रक्षेपित करण्यात आलेला ईओएस-09 हा उपग्रह पूर्वीच्या रिसॅट-वन या उपग्रहाची सुधारित आवृत्ती आहे.
श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण पाहण्यासाठी आलेल्यांना भारत-पाकिस्तान तणावामुळे उद्भवलेल्या सुरक्षा कारणामुळे प्रक्षेपण पाहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. इस्रोने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर या उपग्रह प्रक्षेपण मोहिमेचा सविस्तर तपशील जाहीर केला. ईओएस-09 या उपग्रहाची उंची 44.5 मीटर होती. त्याचे वजन 321 टन होते. या उपग्रहाची निर्मिती चार टप्प्यांत करण्यात आली होती. सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडार तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला हा एक प्रगत निरीक्षण उपग्रह आहे. तो दिवसा आणि रात्री कोणत्याही हवामानात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुस्पष्ट प्रतिमा टिपू शकतो.सूर्याच्या भ्रमणाशी सुसंगत ध्रुवीय कक्षेत हा उपग्रह स्थापित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. पीएसएलव्हीचे हे तिसरे अपयश आहे. पहिले अपयश 20 सप्टेंबर 1993 रोजी प्रक्षेपित झालेले पीएसएलव्ही-डी 1 होते. ऑगस्ट 2017 रोजी आयआरएनएसएस 1 एच नेव्हिगेशन उपग्रह तैनात करण्यासाठी होणारे पीएसएलव्ही प्रक्षेपण अयशस्वी झाले होते.