आणखी एका खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, अवघ्या 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Nicholas Pooran Retirement

Nicholas Pooran Retirement | सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम टी-20 फलंदाज मानल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक निकोलस पूरनने (Nicholas Pooran) अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेट जगतात धक्का दिला आहे.

मागील काही दिवसांपासून अनेक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहेत. विराट कोहली, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेन यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. पूरनने फ्रँचायझी क्रिकेट (Franchise Cricket) खेळणे सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून, अधिकाधिक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून पूर्णपणे फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. यातील काही खेळाडूंनी त्यांच्या सर्वोत्तम काळातच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा

आपल्या निर्णयाबाबत इंस्टाग्रामवर (Instagram) माहिती देताना पूरन म्हणाला, “खूप विचार आणि आत्मचिंतन केल्यानंतर, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.”

त्याने पुढे म्हटले, “आपल्याला आवडलेल्या या खेळाने खूप काही दिले आहे. आनंद, उद्देश, अविस्मरणीय आठवणीआणि वेस्ट इंडिजच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ती मॅरून रंगाचा जर्सी परिधान करणे, राष्ट्रगीत गाताना उभे राहणे आणि प्रत्येक वेळी मैदानावर पाऊल ठेवताना माझे सर्वस्व देणे… याचा माझ्यासाठी काय अर्थ आहे हे शब्दांत मांडणे कठीण आहे. संघाचे कर्णधारपद भूषवणे हा एक विशेषाधिकार आहे जो मी नेहमी माझ्या हृदयात जतन करून ठेवेन.”

“चाहत्यांनो, तुमच्या अटूट प्रेमाबद्दल धन्यवाद. कठीण प्रसंगात तुम्ही मला आधार दिला आणि चांगल्या क्षणांमध्ये अतुलनीय उत्साहात साजरा केले. माझ्या कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांनो या प्रवासात माझ्यासोबत चालल्याबद्दल धन्यवाद. तुमचा विश्वास आणि पाठिंबा यामुळेच मी हे सर्व पार करू शकलो., असे त्याने पुढे लिहिले.

पूरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

29 वर्षीय पूरन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. पूरनने 61 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 106 एकदिवसीय सामने (ODIs) खेळले आहेत, ज्यात त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये 4,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये वेस्ट इंडिजसाठी तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.