Ahmedabad Plane Crash | अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या (Air India Plane Crash) भीषण अपघातात200 हून अधिक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या जीवघेण्या हवाई दुर्घटनेतून केवळ एक व्यक्ती सुदैवाने बचावली आहे.
या भीषण अपघातात 40 वर्षीय रमेश विश्वासकुमार (Ramesh Vishwaskumar) जिवंत बचावण्यात यशस्वी ठरले. हा अपघात अहमदाबादपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर मेघाणी नगरयेथे घडला. रमेश
कोण आहेत रमेश विश्वासकुमार?
रमेश विश्वासकुमार हे ब्रिटिश नागरिक असून, ते आपल्या मोठ्या भावाला, अजय कुमार रमेश भेटण्यासाठी भारतात आले होते. दुर्दैवाने, अजय कुमार या विमानात त्यांच्यासोबत होते आणि सध्या बेपत्ता आहेत. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते, ज्यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला आहे.
Lone survivor in Ahmedabad plane crash JUMPED from the aircraft at the last moment — India Today
— RT (@RT_com) June 12, 2025
His name is Ramesh Vishwaskumar, he was assigned to Seat 11A near the emergency exit
Miracles do happen https://t.co/1dkFm5iPyJ pic.twitter.com/2ljAI2wIU5
रमेश यांच्या छाती, डोळे आणि पायांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ते सीट क्रमांक 11A (Seat Number 11A) वर बसले होते.
“मी घाबरलो होतो. मी उठलो आणि धावलो. माझ्या आजूबाजूला फक्त मृतदेह विखुरलेले होते. विमानाचे तुकडे सर्वत्र पसरले होते” असे रमेश यांनी अपघातानंतरचे वर्णन करताना सांगितले. उड्डाणानंतर काही सेकंदातच मोठा आवाज आला. त्यानंतर विमान जमिनीवर कोसळले. काहीही समजायला वेळच मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.
एका अज्ञात व्यक्तीने त्यांना एम्ब्युलन्समध्ये बसण्यास मदत केली, ज्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर इतर जखमींनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते, तर 12 क्रू मेंबर्समध्ये दोन पायलट आणि 10 कर्मचारी होते. अहमदाबादच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलने सांगितले की, 11 वर्षे जुन्या या दोन इंजिनच्या विमानाने दुपारी 1:39 वाजता उड्डाण केल्यानंतर लगेचच ‘मेडे’ संकटकालीन कॉल जारी केला होता.
अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विमानाचा ब्लॅक बॉक्स (Black Box), म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, शोधण्याचे काम सुरू आहे. रिपोर्टनुसार, विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच वेगाने उंची गमावत होते. त्यानंतर ते अचानक कोसळले. विमान 600-800 फूट उंचीवर चढले आणि लगेच जमिनीवर कोसळले. या अपघाताने अहमदाबादसह संपूर्ण देशाला हादरून सोडले असून, तपास यंत्रणा कारणांचा शोध घेत आहेत.