मुंबई आता जागतिक शिक्षण केंद्र! 5 नामांकित परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात कॅम्पस उभारणार

Foreign Universities In Mumbai

Foreign Universities In Mumbai | मुंबईला जागतिक शिक्षणाचं केंद्र बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. 5 नामांकित परदेशी विद्यापीठे मुंबई व नवी मुंबईत त्यांचे कॅम्पस उभारणार आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाच जागतिक स्तरावरील विद्यापीठांना नवी मुंबईत कॅम्पस उभारण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ दिले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारचा ‘एज्युसिटी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे.

कोणती विद्यापीठे येत आहेत?

या विद्यापीठांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एबरडीन, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इस्टिट्युटो युरोपियो डी डिझाइन यांचा समावेश आहे. मुंबईतील ताजमहाल पॅलेस येथे झालेल्या या कार्यक्रमात कॅम्पस उभारण्यासाठी इरादपत्र देण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गेली 20 वर्षं आपण ऐकत होतो की परदेशी विद्यापीठं भारतात येतील, आज ते स्वप्न साकार होतंय. पंतप्रधान मोदी आणि शिक्षणमंत्र्यांचं यासाठी आभार. ही विद्यापीठं केवळ महाराष्ट्रातच येत नाहीत, तर जागतिक विद्यार्थ्यांसाठी नवे दरवाजे उघडतायत. परदेशात जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे परवडणारं आणि जागतिक दर्जाचं शिक्षण मिळेल. आता कोणतीही स्वप्नं अपूर्ण राहणार नाहीत!”

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या सुधारणांमुळे हे शक्य झाल्याचं सांगितलं. “भारत आता जागतिक ज्ञान केंद्र बनत आहे. UGC च्या नव्या धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना भारतात येणं सोपं झालं. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये असंच मॉडेल यशस्वी आहे,” असं ते म्हणाले. आतापर्यंत नऊ विद्यापीठांना LoI मिळाले असून, आणखी सहा प्रक्रियेत आहेत.