FASTag Annual Pass:  फास्टॅग वार्षिक टोल पास कसे काम करेल आणि कोणाला फायदा होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

FASTag Annual Pass

FASTag Annual Pass | टोल पेमेंट (Toll Payment) सोपे करण्यासाठी आणि रस्ते प्रवास सुधारण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने FASTag आधारित ॲन्युअल पास (FASTag Annual Pass) योजनेची घोषणा केली आहे.

या योजनेअंतर्गत, 15 ऑगस्ट 2025 पासून फक्त 3,000 रुपयांमध्ये कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी एक वर्ष किंवा 200 टोल क्रॉसिंगसाठी वैध पास उपलब्ध होणार आहे. ही योजना नॅशनल हायवेवर नियमित प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे.

ॲन्युअल पास म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय?

FASTag ॲन्युअल पास ही एक अशी योजना आहे, जी नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवेवर टोल पेमेंट प्रक्रिया सुलभ करते. यामुळे प्रवाशांना टोल शुल्कात मोठी बचत, टोल प्लाझावरील गर्दीपासून मुक्ती आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. हा पास एक वर्ष किंवा 200 टोल क्रॉसिंग (जे आधी पूर्ण होईल) यासाठी वैध असेल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 18 जून 2025 रोजी त्यांच्या अधिकृत X हँडलवरून या योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, “60 किलोमीटरच्या अंतरात अनेक टोल प्लाझांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी ही योजना आणली आहे. यामुळे टोल संकलनात पारदर्शकता येईल आणि दैनंदिन प्रवाशांचा अनुभव सुधारेल.”

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • किंमत: फक्त ₹3,000 मध्ये 200 टोल क्रॉसिंग किंवा एक वर्षाची वैधता.
  • बचत: सरासरी टोल खर्च ₹50 वरून ₹15 प्रति ट्रिप, म्हणजेच वर्षाला सुमारे ₹7,000 ची बचत.
  • सोय: टोल प्लाझावरील वाहनांच्या लांब रांगा कमी होऊन प्रवास जलद होईल.
  • पात्रता: कार, जीप, व्हॅनसारखी नॉन-कमर्शियल खासगी वाहने.
  • पर्यायी योजना: हा पास अनिवार्य नाही; ज्यांना हवा नाही, ते नेहमीप्रमाणे FASTag वापरू शकतात.

ॲन्युअल पास कसा मिळवायचा?

15 ऑगस्ट 2025 पासून हा पास खालील माध्यमांतून उपलब्ध होईल:

  • राजमार्ग यात्रा ॲप (Rajmarg Yatra App)
  • NHAI (National Highways Authority of India) ची अधिकृत वेबसाइट
  • MoRTH (Ministry of Road Transport and Highways) ची अधिकृत वेबसाइट

ॲक्टिव्हेशन प्रक्रिया:

  • वैध FASTag क्रेडेन्शियल्स आवश्यक.
  • वाहन नोंदणी क्रमांक (Vehicle Registration Number) आणि मूलभूत व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • सध्याच्या FASTag सोबत हा पास लिंक करता येईल, म्हणजेच नवीन FASTag खरेदीची गरज नाही.

ॲन्युअल पासची वैधता आणि मर्यादा

हा पास नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवे येथील टोल प्लाझांवरच वैध आहे. राज्य महामार्ग किंवा स्थानिक प्राधिकरणांच्या टोलवर सामान्य टोल दर लागू होतील.

200 ट्रिप्सची मर्यादा: हा पास 200 टोल क्रॉसिंग किंवा एक वर्ष (जे आधी पूर्ण होईल) यासाठी वैध आहे. मर्यादा संपल्यावर नवीन पास खरेदी करता येईल.

ट्रिप कशी मोजली जाते?

मंत्रालयाच्या मते, प्रत्येक सिंगल टोल क्रॉसिंग (Single Toll Crossing) एक ट्रिप म्हणून मोजले जाते आणि एक राउंड ट्रिप (Round Trip) म्हणजे दोन ट्रिप्स.

प्रवाशांना याचा कसा फायदा होईल?

नितीन गडकरी यांनी सांगितले, “पूर्वी 200 टोल क्रॉसिंगसाठी सुमारे ₹10,000 खर् लागत होता. आता फक्त ₹3,000 मध्ये हा प्रवास शक्य आहे.” यामुळे विशेषतः दैनंदिन प्रवास करणारे, शहरांमधील प्रवास करणारे आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महामार्ग वापरणारे यांना मोठा दिलासा मिळेल.

FASTag ॲन्युअल पासमुळे टोल प्लाझांवरील रांगा कमी होऊन वाहनचालकांचा वेळ वाचेल. यामुळे इंधनाची बचत आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागेल.

कोणाला लाभ होईल?

  • दैनंदिन प्रवासी: मुंबई-पुणे, दिल्ली-जयपूर, बेंगळुरू-चेन्नईसारख्या मार्गांवर दररोज प्रवास करणारे.
  • लांब पल्ल्याचे प्रवासी: सुट्टीसाठी किंवा कामानिमित्त लांब प्रवास करणारे.
  • खासगी वाहन मालक: कार, जीप, व्हॅनसारखी नॉन-कमर्शियल वाहने चालवणारे.

काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

  1. ॲन्युअल पास अनिवार्य आहे का?

नाही, ही योजना पर्यायी आहे. ज्यांना याचा लाभ घ्यायचा नाही, ते नेहमीप्रमाणे FASTag वापरून टोल भरू शकतात.

2. नवीन FASTag आवश्यक आहे का?

नाही, सध्याच्या FASTag सोबत हा पास लिंक करता येईल.

3. हा पास व्यावसायिक वाहनांसाठी आहे का?

नाही, हा पास फक्त नॉन-कमर्शियल वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन) आहे. व्यावसायिक किंवा मालवाहतुक वाहनांना सामान्य टोल दर लागू होतील.

4. 200 ट्रिप्स संपल्या तर काय?

200 ट्रिप्स किंवा एक वर्ष (जे आधी पूर्ण होईल) नंतर नवीन पास खरेदी करावा लागेल.

5. प्रवाशांनी काय करावे?

15 ऑगस्ट 2025 ची वाट पाहा आणि राजमार्ग यात्रा ॲप किंवा NHAI/MoRTH वेबसाइटवरून हा पास मिळवा. तुमचे FASTag सक्रिय असल्याची खात्री करा आणि वाहन नोंदणी तपशील तयार ठेवा. ही योजना तुमच्या टोल खर्चात मोठी बचत करेल आणि प्रवास अधिक सुलभ करेल.