माहुलची घरे आता पालिकेच्या निवृत्त कर्मचार्‍यांना देण्याचा प्रयत्न

mahul homes

मुंबई – महापालिकेने चेंबूरच्या माहुल येथील घरांच्या विक्रीला तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील पालिका कर्मचार्‍यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता पालिकेने पुन्हा एकदा निकषात बदल केला आहे. पालिकेतून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना आता माहुलची घरे खरेदी करण्यास परवानगी दिली जाणार आहे. पालिकेच्या संबंधित विभागाने तसा प्रस्ताव तयार केला असून त्याच्या मंजुरीसाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केला असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेची माहुल येथे १३ हजार पेक्षाही जास्त घरे रिकामीच आहेत. पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना ही घरे प्रत्येकी १२.६० लाख रुपयांत देण्याची तयारी पालिकेने दर्शवली होती. एका कर्मचार्‍याला किमान दोन घरे खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र तेथे हानीकारक प्रदूषण असल्याने त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.त्यामुळे पालिकेने प्रथम श्रेणी अधिकारी वगळून इतर अधिकार्‍यांनाही ही घरे खरेदी करण्यास परवानगी दिली.मात्र, तरीही माहुलच्या घरांच्या विक्रीला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. गेल्या १५ मार्चपासून एकूण ९०९८ घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली.१५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.या कालावधीत फक्त २३१ अर्ज आले. अल्प प्रतिसादामुळे १५ मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली.शिवाय निकषातही शिथिलता देण्यात आली.परंतु दोन महिन्यांनंतरही फक्त ३३० अर्ज आले. या अर्जदारांनी अनामत रक्कम आणि नियमानुसार घराची प्रक्रिया केली.सोडत काढून २१ जून रोजी या घरांचे वाटप केले जाणार होते.मात्र,३३० पैकी सुमारे ५० कर्मचार्‍यांनीच घरांची रक्कम जमा केली. त्यामुळे पुन्हा ३० जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे.मात्र,त्यातही कर्मचार्‍यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने आता पुन्हा निकषात बदल करून पालिकेच्या निवृत्त कर्मचार्‍यांसाठी आवाहन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.या प्रस्तावाला आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवताच त्याची अंमलबजावणी केली जाईल.