Home / News / कोकणनगर व जय जवान पथकांचा विक्रम!10 थर! मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष

कोकणनगर व जय जवान पथकांचा विक्रम!10 थर! मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष

मुंबई -राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असतानाही श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज मुंबई, ठाण्यात आणि राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. यंदा पुण्यातही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावर्षीच्या उत्सवात ठाण्यात 10 थरांचा मानवी मनोरा विशेष आकर्षण ठरला. सकाळी कोकणनगर गोविंदा पथकापाठोपाठ जय जवान गोविंदा पथकानेही घाटकोपरमध्ये दुपारी व ठाण्यात दोन ठिकाणी संध्याकाळी आणि रात्री असे 3 वेळा विक्रमी 10 थर रचले. मात्र यावेळीही दहीहंडी उत्सवात उत्तान नृत्य सादर होऊन उत्सवाला बट्टा लागला.
कोकणनगर गोविंदा पथकाने सर्वप्रथम 10 थरांची दहीहंडी रचत प्रेक्षकांची मने जिंकली आणि प्रसिद्ध जय जवान पथकाचा 9 थरांचा विक्रम मोडीत काढला. त्यांच्या या यशानंतर जय जवान पथकानेही त्यांचा स्वत:चा जुना विक्रम मोडत तीनवेळा 10 थरांची दहीहंडी रचली. या उत्सवात महिला पथकांचाही सक्रिय सहभाग होता. त्यांनीही यंदा प्रथमच सात थरांचा विक्रम केला.
आर्यन्स गोविंदा,खोपटचा राजा या पथकांनी 9 थर रचत उत्सवात आपले वर्चस्व दाखवले. ठाणे शहरातील वर्तकनगर भागात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीमध्ये सकाळपासूनच मुंबई, ठाण्यातील पथक थर रचण्यासाठी येत होते. दुपारी 12 वाजताच्या सुमारास जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचण्याचा विक्रम केला. या उत्सवात स्पेनमधील बार्सिलोनाची मार्के सॉल्ट ही स्पॅनिश टीमने 12 वर्षांनंतर पुन्हा मुंबईत सहभागी झाली. त्यांनीही मानवी मनोर्‍याचे प्रदर्शन केले. घाटकोपर येथे मनसेचे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवाराने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी त्यांचाच आधीचा 9 थरांचा विक्रम मोडीत काढला.
मुंबईतवरळीत संतोष पांडे यांची परिवर्तन दहीहंडी वरळीच्या जांबोरी मैदानात मोठ्या जल्लोषात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक दहीहंडी फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी गोविंदा पथकांनी उंच मानवी मनोरे रचून छत्रपती संभाजी महारांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटातील प्रसंगांचे सादरीकरण केले.
दादर पश्चिम येथील आयडियल बूक डेपो जवळ साई दत्त मित्र मंडळाने आयोजित केलेली दहीहंडी उत्सवात दरवर्षीप्रमाणे महिला गोविंदा पथकाने मानवी मनोरा रचत सहभाग घेतला होता. यावेळी अभिनय बेर्डे, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हे मराठी कलाकार उपस्थित होते .
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही दरवर्षी प्रमाणे भांडूप येथे चौथ्या थरावर चढत बांगलादेशी घुसखोर प्रमाणपत्र घोटाळा अशी प्रतिकात्मक हंडी फोडत राजकीय संदेश दिला.यावेळी त्यांनी तरुण गोविंदांसोबत जल्लोषात नृत्यही केले. दादरच्या हिंदू कॉलनीत प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथकाने मनोरा रचला . शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या तारामती फाउंडेशनने दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमात यावेळीही अनेक कलाकार हजर झाले होते . ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा आणि लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील विशेष आकर्षण ठरल्या .
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्याच्या टेंभीनाका दहीहंडी उत्सवाची परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी सुरू ठेवली. येथील दहीहंडी कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी गोविंदा पथकांशी संवाद साधला. ठाण्यात रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेता सुनील शेट्टीसह पुष्कर श्रोत्री व इतर कलाकार उपस्थित होते.
उत्सवाच्या आठवणी जागवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्मवीर दिघे यांची सुरू केलेली ही सोन्याची हंडी आता संपूर्ण महाराष्ट्रासह स्पेनपर्यंत पोहोचली आहे. ठाणे ही गोविंदांची पंढरी झाली आहे. हेच आमचे सोने , हेच आमचे वैभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची हंडी फोडली.मागील वर्षी महायुतीने विधानसभेची हंडी फोडलीच तर तीन वर्षांमध्ये विकासाचे थर लावून आम्ही विकासाची हंडी फोडली. विरोधकांनी विकास विरोधी थर लावून हंडी उभारली होती. पण, राज्यातील जनतेने त्यांची हंडी फोडून टाकली आणि त्यांना घरी पाठवून दिले.
पुण्यात यावर्षी 25 मंडळे दहीहंडी उत्सव पारंपारिक ढोल ताशांच्या तालावर साजरा केला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचे प्रमुख पुनीत बालन यांनी सांगितले की,दहीहंडी उत्सवात सांस्कृतिक आणि पारंपारिक रंग आणण्यासाठी ढोल ताशा पथकांसह कार्यक्रम झाले.

मुंबईत 2 गोविंदाचा मृत्यू! 95 गोविंदा जखमी
मानखुर्द महाराष्ट्र नगर परिसरात बाल गोविंदा मंडळासाठी दुपारी 3 वाजता पहिल्या मजल्यावर जाऊन दहीहंडी बांधत असताना 32 वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी याचा खाली पडून मृत्यू झाला. त्याला तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावदेवी गोविंदा पथकातील एका गोविंदाचाही मृत्यू झाला. रोहन वाळवी असे या मृत गोविंदाचे नाव आहे. मालाडमधील ओम साई गोविंदा पथक ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात आठ थर लावत असताना सातव्या थरावरून एक गोविंदा खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना 95 गोविंदा जखमी झाले. 76 जणांना उपचार करून घरी पाठवण्यात आले, तर विविध रुग्णालयांमध्ये 19 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदांपैकी पाच जणांवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. नायर व शीव रुग्णालयामध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार करण्यात आले. जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयामध्ये तीन आणि उपनगरातील अन्य रुग्णालयांमध्ये दोन जणांवर उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे जी.टी. रुग्णालय व सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार करण्यात आले. या दोन्ही गोविंदांच्या डोक्याला मार लागला होता.