Home / News / राज्यात पावसाचा कहर 2 दिवस ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा कहर 2 दिवस ऑरेंज अलर्ट

maharashtra rain

मुंबई काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना झोडपले. या पावसामुळे विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून, या काळात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्याला उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईत काल रात्रीपासून विक्रोळी, सांताक्रूझ, सायन, अंधेरी, मालाडसह अनेक भागांत 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस 248.5 मिमी विक्रोळीत झाला. पूर्व उपनगरात 142.80 मिमी आणि पश्चिम उपनगरात 144.57 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, चुनाभट्टी, आरे, अंधेरी, किंग्ज सर्कल, मालाड, गोरेगाव आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर रुळांवर पाणी साचले. मध्य रेल्वेच्या माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, भांडुप तर हार्बर मार्गावर वडाळा, चुनाभट्टी, टिळकनगर आणि कुर्ला येथे पाणी साचले. हार्बर मार्गावरील सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पश्चिम रेल्वे मार्गावर दादर-माहीम दरम्यान रुळांवर पाणी साचले होते. सकाळी 8 वाजताच्या सुमारास पाणी ओसरू लागल्यानंतर सेवा हळूहळू पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. सायन, किंग्ज सर्कल, आरे कॉलनी, मालाड सबवे येथेही पाणी साचल्यामुळे बेस्टने आपले अनेक बस मार्ग बदलले. वसई-विरार येथेही रात्रभर तुफान पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. स्पाईसजेट एअरलाईन्सने मुंबईतील मुसळधार पावसामुळे सर्व येणार्‍या – जाणार्या विमानांवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती एक्स पोस्ट करून दिली. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी म्हटले की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस झाला.रायगड जिल्ह्यात आज झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि नागोठणे येथील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. रोहा, कोलाड, वाकण, खारघाव आणि खेड गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला . रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांना पावसाचा तडाखा बसला. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील जगबुडी नदीनेही इशारा पातळी ओलांडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील धारोड गावात दुपारी वीज पडून एक महिला मृत्युमुखी पडली, तर दोन जणी जखमी झाल्या. बीडच्या माजलगाव तालुक्यात सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पीके पाण्याखाली गेली आहेत. या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकर्‍यांकडून मागणी केली जात आहे. येथील मांजरा प्रकल्प 90 टक्के भरला आहे. नांदेड जिल्ह्यातही मूग, उडीद, सोयाबीन, कापसाची पिके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.विक्रोळी परिसरात दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यूमुंबई – विक्रोळी पार्क साईट परिसरात आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पावसामुळे मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत सुरेश मिश्रा (50) आणि त्यांची मुलगी शालू मिश्रा (19) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी आरती मिश्रा (45) आणि मुलगा ऋतुराज मिश्रा (20) हे गंभीर जखमी झाले.पार्कसाईट येथील वर्षा नगर विभागातील जनकल्याण सोसायटीमधील मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळली. अपघातानंतर शेजार्‍यांनी तातडीने महापालिका आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी ढिगार्‍यातून 4 जणांना बाहेर काढून घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच सुरेशचंद्र मिश्रा आणि त्यांची मुलगी शालू यांना मृत घोषित करण्यात आले. तर आरती आणि ऋतुराज यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरड कोसळल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरातील इतर घरे तातडीने रिकामी करण्यात आली.