Sharad Pawar Flood Advice: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) मुळे आणि महापुरामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारकडून देखील शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.
या नैसर्गिक संकटानंतर पीडित नागरिकांना भेटण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची गर्दी वाढल्यामुळे, सरकारी यंत्रणांचे लक्ष नुकसानीचे पंचनामे आणि आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचारपूर्ण करण्याकडे वळले आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. यामुळे पंचनाम्यांना विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याची शक्यता आहे.
लातूर भूकंपाचा दिला दाखला
या परिस्थितीत सरकारने कोणते पाऊल उचलावे, हे सांगताना शरद पवार यांनी लातूर भूकंपाच्या वेळच्या निर्णयाची आठवण करून दिली. “लातूर भूकंपावेळी पंचनामे आणि मदतकार्यात अडथळा येऊ नये म्हणून राज्याचा प्रमुख या नात्याने मी लोकप्रतिनिधींचे दौरे थांबवले होते. एवढेच नव्हे, तर इतर नेते आणि दस्तुरखुद्द पंतप्रधानांनासुद्धा काही दिवस भूकंपग्रस्त भागात दौरा करू नयेत अशी विनंती केली होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई बॉम्बस्फोट आणि लातूरचा भूकंप यासारख्या संकटांची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असल्याने प्रशासकीय यंत्रणेला मोकळीक दिल्यास ते समर्पित भावनेने काम करतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाहीतर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. अतिवृष्टीने केवळ शेतकरी वर्ग बाधित झाला नसून त्याची मोठी…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 26, 2025
शेतकरी आणि बारा बलुतेदारांना मोठा फटका
शरद पवार यांनी सध्याच्या संकटाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचे नुकसान झाले नाही, तर जनावरेही मोठ्या प्रमाणात दगावली आहेत. याची मोठी झळ गावातील शेतकरी वर्गासह लहान-मोठे व्यावसायिक, कारागीर, शेतमजूर आणि बारा बलुतेदार तसेच मागासवर्गीय समुदायालाही बसली आहे.
या गोष्टींकडे तातडीने लक्ष द्या:
गावपातळीवर इंधनाचा आणि अन्नाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान करण्याची आवश्यकता आहे. रोगराई पसरण्याची शक्यता असून त्यास आळा घालून आरोग्याच्या सुविधा देखील तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे. विध्यार्थांच्या शिक्षणावर देखील विपरीत परिणाम झाला असून त्याकडे त्वरेने लक्ष द्यावे लागेल, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नुकसानीच्या पंचनाम्यांचा व्याप पाहता, मदतकार्य वेळेत सुरू व्हावे यासाठी आपत्तीग्रस्त भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त मनुष्यबळ (Manpower) आणि महसूल, कृषी, पाटबंधारे यांसारख्या शासकीय विभागातील अधिकारी तातडीने पाचारण करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
हे देखील वाचा – संयुक्त राष्ट्रात मोठा ड्रामा! गाझामधील कारवाईवरून इस्रायलला धक्का; नेतन्याहूंचे भाषण सुरू असताच अनेक देशांच्या प्रतिनिधींचा सभात्याग