Jain Muni Politics: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील कबुतरखाने बंद केल्यापासून जैन समाज संतापला आहे. कबुतरखाने बंद केल्यामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा करत या समाजाने आज त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विशेष प्रार्थनासभा आयोजित केली. त्यानंतर झालेल्या धर्मसभेत जैन मुनींनी ‘शांतीदूत जनकल्याण पार्टी’ नावाच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. हा पक्ष महापालिका निवडणूक लढवेल.( Jain Muni Politics )पक्षाचे चिन्ह कबुतर असेल, असेही घोषित केले. त्यामुळे कबुतरखान्यांसाठी सुरू केलेला लढा जैन समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात घेऊन जाणार आहे. या धर्मसभेत जैन धर्मगुरूंनी जी मुक्ताफळे उधळली, त्यावरून त्यांच्या पक्षाच्या प्रचाराची दिशा काय असेल, याचाही अंदाज आजच आला.
दादर येथील योगी सभागृहात पार पडलेल्या धर्मसभेनंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, जैन समाज हा शांतीप्रिय आणि सर्वाधिक कर भरणारा समाज आहे. मुंबईतील जैन समाज नेहमीच सर्व समाजांच्या मदतीला धावून जातो. आम्ही महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांची देणगी दिली, तरी आमच्या मुद्यांवर कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे कबुतरांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या हक्कांसाठी आता आम्ही राजकारणाचा मार्ग स्वीकारत आहोत. या नव्या पक्षाचे नाव ‘शांतीदूत जनकल्याण पक्ष’ असेल, तर कबुतर हे पक्षाचे चिन्ह असेल. कारण कबुतर शांतीचे प्रतीक आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांच्या फलकावर वाघाचे चिन्ह होते. वाघ हे माता जगदंबेचे वाहन आहे आणि त्यामुळे शिवसेनेला तिचा आशीर्वाद मिळाला. आता आमचे चिन्ह कबुतर असेल, ते शांततेचे दूत आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष प्रत्येक वॉर्डातून उमेदवार उभे करणार आहे. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही. ही फक्त जैनांची पार्टी नाही, तर गुजराती आणि मारवाडी समाजाचाही त्यात सहभाग असेल. आमच्या जनकल्याण पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना प्रवेश असेल. आमची पार्टी भगवान महावीरस्वामींच्या तत्त्वांवर आधारित आहे. कबुतरामुळे महायुतीचे सरकार जाणार आहे. कांद्यामुळे काँग्रेसचे आणि कोंबडीमुळे शिवसेनेचे सरकार गेले, आता कबुतर सेना-भाजपाला उडवून लावेल.शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी या मुद्यावरून जैन समाजावर केली होती. यावर जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले की, त्यांना वेड लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेत्यांना आवर घालावा.
या धर्मसभेत स्वरूपानंदजी महाराज यांनी तर सरकारला थेट इशाराच दिला. ते म्हणाले की, जर आमच्या प्राण्यांवर हल्ला झाला, तर आम्ही मौन धारण करणार नाही. त्यांना वाचवण्यासाठी शस्त्र उचलावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही. आज जे सत्तेत आहेत त्यांना साधुसंतांनीच बसवले आहे. आम्ही घराघरांत जाऊन प्रचार केला आणि त्यातूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण जर साधुसंतांच्या भावनांशी खेळाल, तर आम्ही रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
सुरेशजी महाराज म्हणाले की, कबुतर हा प्राणी आहे. त्याची हत्या झाली म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखे आहे. सर्व सनातनी धर्म तुमच्यासोबत आहे. कबुतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे.
धर्मसभेतील जैन मुनींच्या वक्तव्यानंतर आमदार मनीषा कायंदे यांनी पुन्हा एकदा जैन समाजावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. मनुष्याच्या जीविताशी हा संबंधित विषय आहे. त्या विषयाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांच्या घरातले कुणी फुफ्फुसाच्या आजारामुळे मृत्युमुखी पडले असेल आणि ते कबुतरांमुळे झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांनी असे वक्तव्य केले असते का? कुठल्याही जैनांच्या घरी कबुतराचा फोटो आहे का? तुम्ही त्याची पूजा करता का? तो एक पक्षी आहे.
एक-दोन मेले तर काय?
कैवल्यरत्न मुनींचे वक्तव्य
जैन मुनी कैवल्यरत्न यांनी या धर्मसभेत अत्यंत धक्कादायक विधान केले. ते म्हणाले की, मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्याने काय होते? दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही. कबुतरखान्यावरून राजकारण सुरू आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा आज धर्मसभेत आले नाहीत, ही सरकारची मिलीभगत आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
अभिनेत्रीच अकाली निधन आणि नवऱ्याची ती भावनिक पोस्ट; शेफालीच्या आठवणीत परागची धक्कादायक पोस्ट..
मुंबई मेट्रो ३ ला प्रवाशांची तुंबळ गर्दी, मुंबई मेट्रो- ३ला प्रवाशांची पसंती.