Raj and uddhav thackeray– मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुन्हा एकदा शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Raj and uddhav thackeray)मातोश्री निवासस्थानी गेले. यावेळी ते सहकुटुंब मातोश्रीवर गेले होते. मातोश्रीवर अडीच तास घालवत राज ठाकरे यांच्या कुटुंबाने तिथे स्नेहभोजन केले. या भेटीबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या भेटीचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीशी संबंध नाही. ही एक कौटुंबिक भेट आहे. ठाकरे बंधू स्नेहभोजनात रमलेत, पण युती कधी जाहीर करणार ते सांगा असे शिवसैनिक आणि मनसैनिक विचारत आहेत. कारण कौटुंबिक जिव्हाळ्याचे चित्र अनेकदा उभे केले तरी राजकारणात ऐनवेळी काहीही होऊ शकते हे कार्यकर्त्यांना ठाऊक आहे.
आज दुपारी एक वाजताच्या सुमारास मनसेप्रमुख राज ठाकरे हे आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित आणि सून मितालीसह मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. सर्वांच्या गाड्या वेगळ्या असल्याने गाड्यांचा ताफाच निघाला होता. गेल्या तीन महिन्यांतील ठाकरे बंधूंची ही सहावी, तर या आठवड्यातील दुसरी भेट होती. दुपारी शिवतीर्थ निवासस्थानाहून राजे ठाकरेंचा ताफा मातोश्रीवर रवाना झाला. त्यावेळी मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर त्यांनी माध्यमांना आपल्या नेहमीच्या शैलीत, कसली महापालिका निवडणुकीची चर्चा? आई सोबत आहे, समजून घ्या, असे म्हणत ही कौटुंबिक भेट असल्याचे दाखवले. या भेटीत त्यांनी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळशीचे रोप उद्धव ठाकरेंना भेट दिले. त्यानंतर हे कुटुंब सुमारे अडीच तासांनी मातोश्रीबाहेर पडले.
मनसे नेते बाळा नांदगावकर यावर म्हणाले की, एकाच कुटुंबातील दोन दुरावलेली भावंडे एकत्र येत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. राजकारण किंवा इतर क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील लोक नाती जपत असतात. एवढ्या वर्षांनी ठाकरे बंधूंच्या होणार्या वारंवार भेटींमुळे महाराष्ट्रातील जनतेला आनंद होत असेल. कारण हे प्रबोधनकार, बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांचे कुटुंब आहे. त्यामुळे या कुटुंबाकडे बघण्याचा मराठी माणसाचा दृष्टिकोन वेगळा आहे. याकडे राजकारण सोडून पाहण्याची आवश्यकता आहे.
उबाठा व मनसे युतीबद्दल ते म्हणाले की, ज्या पद्धतीने दोन्ही भावांमध्ये मनोमिलन आणि विश्वास निर्माण होत आहे, ते पाहता ते युतीच्या मार्गावर जाताना दिसत आहेत. परंतु कोणतीही गोष्ट जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत आपल्याला स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही. वारंवार दोन्ही भावांच्या भेटीगाठी होत आहेत म्हणजे त्यांचा उत्तम संवाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मराठी माणूस ठाकरे ब्रँडबाबत नक्कीच काहीतरी चमत्कार करील. आतापर्यंत काळ आला नव्हता आणि वेळही आली नव्हती. परंतु आता काळ आणि वेळही आली आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात काहीतरी नवीन चित्र दिसेल, अशी मला आशा आहे.
मनसेचे अविनाश जाधव म्हणाले की, ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी होत राहणार आहेत. ते एक कुटुंबच आहे. ते एकमेकांना भेटायला जाऊ शकतात. आधी ते भेटत नव्हते तर दु:ख होते. आता भेटत आहेत, तर का भेटता असा प्रश्न विचारला जात आहे. महाराष्ट्रात इतर प्रश्न आहेत त्यावर भाष्य झाले पाहिजे. पण दोन्ही भावांच्या भेटी अशाच वाढत राहणार आहेत. सध्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले नाही. त्या जवळ आल्यावर युती-आघाडीबद्दल चर्चा करणे योग्य ठरेल.
उबाठा नेते अंबादास दानवे याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ठाकरे एक कुटुंब आहे. प्रत्येक भेटीमागे युती-आघाडी होणार का, याबाबत चर्चा करणे योग्य नाही. कुटुंब आणि राजकारण दोन स्वतंत्र विषय आहेत. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. खासदार संजय राऊत हे युतीबाबत संकेत देत आहेत. राऊत शिवसेना उबाठाचे मुख्य प्रवक्ते व नेते आहेत. त्यांनी सांगितले म्हणजे सत्यच असणार आहे. उद्धव ठाकरे यांनीही एकत्र राहण्यासाठी एकत्र आल्याचे म्हटले असल्याने याचा अर्थ युती होणार असाच आहे. भाजपा नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आजच्या ठाकरे बंधूंच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, उद्धव आणि राज हे दोघे भाऊ आहेत. दिवाळीनिमित्त आपले कुटुंब, नातवंडे, बहिणी एकत्र आल्या पाहिजेत. याकडे राजकारण म्हणून बघू नये.
पुन्हा एकत्र पोस्टर
ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात उबाठा-मनसे 13 ऑक्टोबर रोजी एकत्र मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची पोस्टर ठाण्यात झळकली असून, त्यात राज आणि उद्धव यांच्याबरोबर आदित्य आणि अमित ठाकरे यांचीही छायाचित्रे आहेत.
हे देखील वाचा –
गडचिरोली जिल्ह्यात ड्रोनद्वारे टपाल सेवा
तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसींचे ४२ टक्के आरक्षण स्थगित !