Congress opposes MNS -उबाठा आणि मनसे एकत्र निवडणूक लढतील असे आता जवळजवळ स्पष्टच झाले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र मविआतील काँग्रेस पक्षाने अद्याप मनसेबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. परंतु आज काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत मनसेबरोबर जाण्यास विरोध (Congress opposes MNS)असल्याचे संकेतच दिले. चेन्नीथला म्हणाले की, मनसेसोबत जाण्याबाबत आज कोणतीही चर्चा झाली नाही. तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. मविआमध्ये उबाठा, राष्ट्रवादी आणि आम्ही असे तीनच पक्ष आहोत. दुसर्या कोणत्याही पक्षाला मविआत घेण्याचा कोणताही इरादा नाही.
उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटून निवडणूक पारदर्शकपणे घ्यावी याबाबत निवेदन देणार आहे. या शिष्टमंडळात मविआच्या तिन्ही पक्षांसोबत मनसे नेते राज ठाकरेही सहभागी होणार आहेत. मनसेने या शिष्टमंडळात सहभागी होण्यास काँग्रेसने मान्यता दिली आहे का? ही मान्यता दिली असेल तर मनसेसोबत आघाडी करून स्थानिक निवडणुका लढविण्यास काँग्रेस तयार आहे का? या प्रश्नांचीच चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. आज काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या विविध बैठका झाल्या. या बैठकीत मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाने कुणाशीही युती न करता एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठाम मत वर्षा गायकवाड व इतर स्थानिक नेत्यांनी मांडले. यावर चेन्नीथला काय म्हणतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. आजच्या पत्रकार परिषदेत चेन्नीथला यांना मनसेबाबतच सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले.
या प्रश्नांना उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले की, उद्या जे शिष्टमंडळ आयोगाला भेटायला जाणार आहे त्यात आमचे नेते बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड सहभागी होतील. संजय राऊत यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी आम्हाला या शिष्टमंडळात सहभागी होण्याबाबत पत्रही दिले आहे. हा विषय मूळ आमचाच आहे. राहुल गांधी यांनीच मतचोरीचा विषय आघाडीवर आणला आहे. यामुळे आमच्या विषयाबाबत आयोगाला भेटायला शिष्टमंडळ जाणार असेल तर आम्ही या शिष्टमंडळात निश्चित सहभागी होणार आहोत. या शिष्टमंडळात मनसे नेते राज ठाकरे हेही सहभागी होणार असून मनसेला तुमचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारला असता चेन्नीथला म्हणाले की, या शिष्टमंडळात येण्यासाठी भाजपासह सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे. आम्ही या शिष्टमंडळात सहभागी होणार आहोत. इतर कोणते पक्ष येणार आहेत याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. या उत्तरातूनच चेन्नीथला यांनी मनसेचा विषय साफ
फेटाळून लावला.
आज सकाळी उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले की, काँग्रेस आपल्यासोबत असावी अशी स्वत: राज ठाकरे यांची इच्छा आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ माजली. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी मनसेच्या आजच्या बैठकीनंतर स्पष्ट केले की, काँग्रेसबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील. हा निर्णय राज ठाकरे किंवा मनसेचे प्रवक्तेच जाहीर करतील. दुसरा कोणी हा निर्णय कसा जाहीर करू शकतो? या सर्व घडामोडी होत असतानाच संजय राऊत हे आरोग्याच्या तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. आपल्या वक्तव्याने गोंधळ उडाला आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी राज ठाकरे यांना मोबाईलवरून संदेश पाठवत मी तसे वक्तव्य केलेच नाही, असे सांगितल्याचे कळते.
मनसेच्या मविआतील प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाने म्हटले की, काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करीत असतात. अशा पक्षासोबत राज ठाकरे जातील असे वाटत नाही. राऊत यांनी कितीही सुपारी घेतली तरी त्यांना मनसे संपवता येणार नाही.भाजपाच्या सुरात सूर मिसळत शिंदे गटानेही काँग्रेसवर निशाणा साधला. कोणत्या पक्षाने कुणासोबत जायचे याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची काँग्रेसची भूमिका जगजाहीर असताना अशा पक्षासोबत राज ठाकरे जातील असे वाटत नाही, असे शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत म्हणाले.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
महाराष्ट्राला पुन्हा एकदा मुसळधारेचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज..
तुम्ही लोक कचरा आहात..कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला..
तालिबानचा पाकिस्तानला कठोर इशारा..एकमेकांविरोधात मोठे दावे..