Home / शहर / Mavia-Raj delegation- याद्या सुधारा! मगच निवडणूक घ्या ! मविआ-राज शिष्टमंडळाची ठाम मागणी

Mavia-Raj delegation- याद्या सुधारा! मगच निवडणूक घ्या ! मविआ-राज शिष्टमंडळाची ठाम मागणी

Mavia-Raj delegation- मविआ नेते आणि राज ठाकरे आज दुसर्‍या दिवशी निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना एकत्र...

By: Team Navakal
Maharashtra State Election Commission

Mavia-Raj delegation- मविआ नेते आणि राज ठाकरे आज दुसर्‍या दिवशी निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना एकत्र भेटले. यावेळी त्यांनी आयोगाला स्पष्ट सांगितले की, मतदार याद्यांत घोळ आहेत. ते आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. या याद्या सुधारा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या. सहा महिने लागले तरी चालेल, पण याद्या सुधारल्या गेल्याच पाहिजेत. यानंतर आयोगाच्या दोन्ही अधिकार्‍यांनी केंद्रीय अधिकार्‍यांशी बोलून दोन दिवसांत सांगतो असे म्हटले. ते काय सांगतात ते ऐकून मविआ व राज ठाकरे Mavia-Raj delegation पुढील रणनीती ठरवणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र म्हटले की, पराभव दिसू लागल्याने हे आरोप केले जात आहेत.


आज सलग दुसर्‍या दिवशी शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींवर प्रश्नांची सरबत्ती केली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी  मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारले. पण दोन्ही अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. दोनेक दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ असे त्यांनी आश्वासन दिले. आज शरद पवार हे आपल्या पुर्वनियोजित पुणे दौर्‍यामुळे बैठकीला आले नाहीत. आजच्या बैठकीत उद्धव व राज हे ठाकरे बंधू शेजारी बसले होते. अमितही आदित्यच्या शेजारी होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील, कम्युनिस्ट नेते अजित नवले, अनिल परब, अनिल देसाई, बाळा नांदगावकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच चोक्कलिंगम आणि वाघमारे यांची नेत्यांनी झाडाझडती घेतली. तब्बल सव्वा तास ही बैठक झाली.


निवडणूक अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीनंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी महाविकास आघाडी व सहयोगी पक्षांची पत्रकार परिषद, असे  फलकावर लिहिले होते. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते जयंत पाटील म्हणाले की, काल आयोगाला याद्यांतील अनंत चुका दाखवल्या. त्यानंतर आयोगाने आश्वासन दिले की, हे निवेदन केंद्रीय आयोगाला पाठवून सुधारणा करून घेतो. आम्ही आज त्यांना पुरावे दिले. मतदारांचे अपूर्ण, चुकीचे पत्ते आहेत. मुरबाड मतदारसंघात बूथ क्र. 8 मध्ये 400 मतदारांच्या घरांचा क्रमांकच नाही. बडनेरा, कामठीतही हाच प्रकार घडला आहे. दुबार मतदारांची संख्या मोठी आहे. नालासोपारा येथे सुषमा गुप्ताचे नाव वेगवेगळ्या मतदार ओळख क्रमांकखाली (एपिक क्रमांक) नोंदवले आहे. याबद्दल दुपारी 3 वाजता चॅनलवर माहिती आली आणि सायंकाळी आयोगाच्या संकेतस्थळावरून गुप्ता  गायब झाली. याची तक्रार आयोगाकडे कुणी केली होती? कुणी जाऊन स्थळ पाहणी केली का? याबद्दल विचारणा केल्यावर आयोगाने म्हटले की हा प्रकार त्यांना माहीत नाही . तेव्हा आमच्या लक्षात आले की आयोगाचे सर्व्हर, संकेतस्थळ कुणीतरी बाहेरून चालवत आहे.


जयंत पाटील यांनी पुढे सांगितले की, नाशिक मध्य, पुणे येथे एकाच घरात 700-800 मतदार दाखवले आहेत. याची तक्रार केल्यावर गोपनियतेमुळे अधिक माहिती देऊ शकत नाही, असे आयोग म्हणाले. राज्य किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हातात आता काही राहिले नाही. तिसरीच कुणीतरी व्यक्ती हे सगळे हाताळत आहे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवे आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने उत्तर देऊ नये, असा टोला त्यांनी लगावला.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेच्या यादीत प्रचंड दोष आहेत. याद्यांमध्ये हे दोष आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते. पण त्या दोषांसकटच विधानसभा निवडणूक घेतली. एखाद्या शिक्षण संस्थेत वसतिगृह असेल तर तिथे वेगवेगळ्या राज्यांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मतदार करण्यात आले. जुन्या दोषांसकटच केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली यादी 1 जुलैला राज्य निवडणूक आयोगाकडे दिली. आता तीच यादी वापरणार आहेत. अशावेळी निवडणूक होणे योग्य नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले की, मतदान गोपनीय असते. पण मतदार आणि मतदार यादी गोपनीय कशी? सीसीटीव्ही आयोग बघते आणि त्याची विल्हेवाट लावते. आम्हाला फुटेज देत नाहीत. मतदार कोण आहेत हे आम्हाला कळले नाही, तर काय उपयोग? आयोग केवळ निवडणूक घेते. पण राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. त्यामुळे आयोग आम्हाला याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ हाच आहे

हे स्पष्ट होते. 2024 मध्ये कांदिवली पूर्व मतदारसंघातील एका यादीत वडिलांचे वय 117 वर्ष, तर मुलाचे वय 124 दाखवले आहे. मुलाचे वय वडिलांपेक्षा जास्त, असेही घोळ आहेत. निवडणुकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावरील याद्यांमध्ये केवळ नावे आहेत. फोटो नाहीत. पत्ते नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वर्षांपासून झाल्या नाही. त्यामुळे त्या आणखी थोड्या विलंबाने झाल्या तरी हरकत नाही . याद्या दुरुस्तीसाठी अजून सहा महिने लागतील. तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. निवडणूक कार्यक्रम जाहीर करणारी कालची अधिसूचना रद्द करावी. मतचोरी पकडल्यानंतर संकेतस्थळावरून नावे गायब होतात. याबद्दल आयोगालाच काही माहिती नाही. मग हे सगळे कोण करते, हा मूळ प्रश्न आहे. याबद्दल आयोगाने चौकशीचे आश्वासन दिले आहे. आयोगाकडून एक-दोन दिवसांत निर्णय होईल. त्यानंतर आम्ही एकत्रितपणे पुढचा निर्णय घेऊ.


महाविकास आघाडीत सामील होण्याच्या प्रश्नावर राज यांनी उत्तर देताना म्हटले की 2017 मध्येही मी याच भूमिकेत दिसलो होतो. निवडणूक कशी होणार हा मुद्दा आहे. कोणाबरोबर होणार हा मुद्दाच नाही. 2017 साली मी हाच मुद्दा मांडला होता. तेव्हाअजित पवारही सोबत होते.


उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाहीसाठी, महाराष्ट्रासाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भाजपालाही बोलावले होते. पण ते आजही आले नाहीत. विधानसभा निवडणुकीआधी आम्ही आयोगाला पत्र लिहिले होते. भाजपा कार्यकर्ते मतदार याद्यांत छेडछाड करत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मतदार घुसडणे, काढून टाकण्याचे प्रकार भाजपाचे लोक करत होते. निवडणूक नि:पक्ष झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकाराची स्वतःहून दखल घ्यावी. प्राण्यांच्या प्रकरणात ते पुढाकार घेतात तशी सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी. आम्ही बोलत असतानाच आयोगाने कालच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. सत्ताधार्‍यांच्या चोरवाटा आम्ही अडवल्या आहेत. मुंबई पालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरणार नाहीत. म्हणजे यांना काही पुरावाच शिल्लक
ठेवायचा नाही.

हिरवे आणि लाल शाईचे पेन

जयंत पाटील यांनी सांगितले की, गेल्या निवडणुकीआधी सत्ताधार्‍यांच्या कार्यकर्त्यांना सोयीच्या नावांपुढे हिरव्या रंगाने खूण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. गैरसोयीची नावे आहेत, त्यावर लाल रंगाने खूण करा. त्यानंतर गैरसोयीची नावे मतदारयाद्यांमधून काढून टाकण्यात आली आहेत.

देवांग दवे कोण?
देवांग दवे हा भाजपाचा पदाधिकारी आहे. त्याला राज्य निवडणूक आयोगाचे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे त्याच्याच माध्यमातून हा प्रकार होत असावा, असा आमचा संशय आहे, असे काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार
यांनी सांगितले.

—————————————————————————————————————————————————–

हे देखील वाचा – 

केजरीवाल बाबत सुनावणीत चालढकल कोर्टाने खडसावले ! ईडीला शेवटची संधी

 भारताची कृत्रिम बुद्धिमत्ताही अदानीच्या हाती! गुगलशी करार

अभिनेत्री मधुमती यांनी वयाच्या ८७ वर्षी घेतला अखेरचा श्वास..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या