Asia Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांना नेहमीच एक वेगळी धार असते. आशिया कप स्पर्धेत याच तीव्र प्रतिस्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या वादांवर ICC ने अखेर आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे, तर भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव याला 30 टक्के मॅच फी चा दंड ठोठावण्यात आला आहे.
सूर्यकुमार यादव का दोषी ठरला?
सूर्यकुमार यादवला ICC आचारसंहितेच्या कलम 2.21 (खेळाची बदनामी करणारे वर्तन) च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. भारताच्या विजयानंतर त्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक न करता थेट ड्रेसिंग रूमकडे जाणे पसंत केले होते.
तसेच, त्याने भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा देत पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या. राजकीय तणावामुळे त्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे त्याला दोन डिमेरिट पॉइंट्स आणि 30% मॅच फी चा दंड भरावा लागला.
रौफवर सर्वाधिक कठोर कारवाई
हॅरिस रौफ हा आशिया कपमधील वेगवेगळ्या सामन्यांदरम्यान अनेकवेळा वादाच्या केंद्रस्थानी राहिला. त्याला दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कलम 2.21 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले.
त्याने भारतीय चाहत्यांकडून ‘कोहली, कोहली’ च्या घोषणा झाल्यानंतर ‘6-0’ आणि विमानाचा इशारा केला होता. या दोन उल्लंघनांमुळे त्याला एकूण चार डिमेरिट पॉइंट्स (प्रत्येक घटनेसाठी दोन) मिळाले, ज्यामुळे त्याच्यावर नियमानुसार दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
इतर खेळाडूंवरील कारवाई
- साहिबजादा फरहान (पाकिस्तान): अर्धशतकानंतर ‘बंदुकीचा इशारा’ केल्याबद्दल त्याला एक डिमेरिट पॉइंट आणि अधिकृत ताकीद मिळाली.
- जसप्रीत बुमराह (भारत): रौफच्या विमानाचा इशाऱ्याला उत्तर म्हणून त्याने केलेल्या कृतीबद्दल कलम 2.21 चे उल्लंघन मान्य केले. परिणामी, त्याला एक डिमेरिट पॉइंट आणि अधिकृत ताकीद देण्यात आली.
- अर्शदीप सिंग (भारत): त्याच्यावरील कथित गैरवर्तनाच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता झाली आणि कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
ICC च्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान खेळाडूंनी व्यावसायिक वर्तन राखणे अनिवार्य आहे, हा संदेश देण्यात आला आहे.
हे देखील वाचा – Maharashtra Elections 2025 : महाराष्ट्रात 247 पैकी 246 नगर परिषदांची निवडणूक, फक्त ‘या’ नगर परिषदेची प्रक्रिया थांबली; कारण काय?









