BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांची धार वाढलेली असतानाच, आज १३ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचाराचा कालावधी संपणार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात असतानाच, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून एक गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. वरळी मतदारसंघात कथितरित्या पैसे वाटप झाल्याचे आरोप करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक १९३ मधील उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी महिलांना एका बैठकीच्या निमित्ताने बोलावून थेट रोख रक्कम वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकाराबाबत अपक्ष उमेदवारांसह शिवसेना (शिंदे गट) च्या नेत्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले असून, हा प्रकार निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावरून राजकीय वातावरण अधिकच चिघळले आहे.
BMC Election 2026: माजी शाखाप्रमुखाचानेच केला थेट आरोप
या प्रकरणाला आता अधिकच राजकीय वळण मिळाले असून, हे आरोप करणारे सूर्यकांत कोळी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख असल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. प्रभाग क्रमांक १९३ मधून पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या सूर्यकांत कोळी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरच त्यांनी कथित पैसे वाटपाशी संबंधित व्हिडिओ सार्वजनिक केले असून, या माध्यमातून त्यांनी थेट पक्षातील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सूर्यकांत कोळी यांनी केलेल्या आरोपांमुळे वरळी मतदारसंघातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात या प्रकरणामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या गंभीर आरोपांवर पक्षाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, तसेच निवडणूक आयोग किंवा संबंधित यंत्रणा याबाबत काही कारवाई करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BMC Election 2026: दोन दिवसात दोन गंभीर घटना, मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये कथित पैसे वाटपाच्या आरोपांमुळे राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. रविवारी भाजपकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या आरोपांच्या आधारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीन ते चार संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी तत्काळ कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला असून, त्यामुळे पक्षांत असंतोष वाढला आहे.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच काल रात्री पुन्हा एकदा तुकाराम नगर परिसरात तणाव निर्माण झाला. भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर आणि त्यांच्या सोबत असलेले अन्य दोघे जण पैसे वाटपासाठी परिसरात आले असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. या आरोपांवरून शिवसेना उमेदवार आणि ओमनाथ नाटेकर यांच्यात जोरदार वाद झाला, जो पुढे हाणामारीत परिवर्तित झाला. या झटापटीत दोन्ही गटांतील काही कार्यकर्ते जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सलग दोन दिवस गंभीर स्वरूपाच्या घटना घडूनही अद्याप कोणत्याही प्रकारची गुन्हे नोंद न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवसेनेचा आरोप आहे की, इतक्या गंभीर प्रकरणांनंतरही पोलिसांकडून केवळ ‘तपास सुरू आहे’ एवढेच सांगितले जात असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐन निवडणूक काळात ऐरणीवर आला आहे.









