BJP-Ubatha-MNS : मुंबई पालिका कुणाच्या हाती जाणार यावर गेले आठवडाभर सुरू असलेल्या सौदेबाजीने आज आणखी धक्कादायक वळण घेतले. आता भाजपा, उबाठा आणि मनसे (BJP-Ubatha-MNS ) एकत्र येऊन पालिकेवर सत्ता स्थापन करणार असे संकेत राज ठाकरे यांनी दिले. हा निर्णय झाला तर तो जनहितासाठी घेतलेला लवचिक राजकारणाचा निर्णय असेल असे सूतोवाच राज ठाकरे यांनी केले. पण हे लवचिक राजकारण नसून सत्तेचे कणाहीन राजकारण आहे. जनतेने जो कौल दिला तो धुडकावून लावताना जर राजकारण्यांना काहीही वाटत नसेल तर राजकारणात नैतिकतेचा तळ गाठला असेच म्हणावे लागेल.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पोस्ट करीत म्हटले की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आजच राज ठाकरे यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्याचे विविध अर्थ काढले जात आहेत. राज यांच्या समन्वयाने जन्मशताब्दी वर्षात दोन जुने मित्रपक्ष भाजपा आणि उबाठा एकत्र येणार का? की दुभंगलेल्या शिवसेनेचे शिंदे व उबाठा गट एकत्र येऊन भाजपाला आव्हान देणार का? असाही विचार चर्चेत आला. राज ठाकरे यांना नेमकी कोणती लवचिक भूमिका अपेक्षित आहे याचीच आता चर्चा होत आहे. पण पालिकेसाठी भाजपा, उबाठा आणि मनसे एकत्र येणार याचीच चर्चा अधिक रंगली. याचे कारण सकाळीच पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन करताना राज ठाकरे यांनी केलेली सूचक पोस्ट लक्षवेधी ठरली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून बाळासाहेबांना अभिवादन केले या दोन्हींचा संबंध जोडून राज्यात दोन जुने मित्रपक्ष (भाजपा आणि उबाठा) पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. आज सकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्वीट करत म्हटले की, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिग्गज व्यक्तिमत्त्वालाभावपूर्ण आदरांजली!
त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये बाळासाहेबांबद्दल विस्तृत लिहिले. ते म्हणतात की, एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावे हे दुर्मीळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकते आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा बाळासाहेबांचे स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा.
ते पुढे म्हणतात की आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झाले आहे. प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळाले आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजले जाते . बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचे अप्रूप नव्हते, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचे समाधान मात्र त्यांना मिळाले .सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा. बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितके खरे आहे तितकेच बाळासाहेबांसारखे राजकारण करणे यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरे आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणे बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे.
राज ठाकरे शेवटी म्हणतात की राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचे मराठी माणसावरचे प्रेम तसूभर पण कमी झाले नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेले . हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल.
बाळासाहेबांचे मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेले जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे ’बाळासाहेब’ आणि ’मराठी’ या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभर पण कमी होणार नाही. स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन!
पंतप्रधान मोदी यांची मराठीतील पोस्ट आणि राज यांची पोस्ट याचा संबंध जोडून दोन जुने मित्र एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा आणि शिंदे सेनेला मनसेने पाठिंबा दिल्याने या चर्चेला आणखी जोर आला आहे.
———————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
मोदी सरकारचा मोठा निर्णय; वृद्धापकाळात मिळणार 5000 रुपयांपर्यंत पेन्शन









