Namo Shetkari Yojana : राज्यातील बळीराजासाठी फेब्रुवारी महिना आनंदाची बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना आणि केंद्र सरकारची ‘पीएम किसान’ योजना अशा दोन्ही योजनांचे मिळून ४,००० रुपये पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. विशेषतः आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाण्याची चिन्हे आहेत.
पुढच्या महिन्यात ४,००० रुपये कसे मिळणार?
केंद्र आणि राज्य सरकारकडून दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना प्रत्येकी २,००० रुपयांचा हप्ता दिला जातो.
- पीएम किसान योजना: केंद्र सरकारने आतापर्यंत २१ हप्ते वितरित केले असून, २२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येणे अपेक्षित आहे. नोव्हेंबर महिन्यात शेवटचा हप्ता जमा झाला होता, त्यानुसार आता पुढच्या हप्त्याची वेळ झाली आहे.
- नमो शेतकरी योजना: राज्य सरकार केंद्राच्या धर्तीवरच वर्षाला ६,००० रुपये देते. केंद्राचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण आठवडाभरात राज्य सरकारचाही हप्ता जमा केला जातो. अशा प्रकारे दोन्ही योजनांचे मिळून एकूण ४,००० रुपये शेतकऱ्यांना मिळतील.
निवडणुकीपूर्वी लाभ मिळण्याची शक्यता
राज्यात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैशांचे वितरण करण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जमा रकमेचा मेसेज धडकू शकतो.
९४ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा
महाराष्ट्रात नमो शेतकरी योजनेचे अंदाजे ९० ते ९४ लाख लाभार्थी आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना फेब्रुवारीतील हप्त्याचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केले आहे आणि आधार लिंकिंगची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली आहे, त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुमची कागदपत्रे आणि बँक खाते अपडेट असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.









