Turmeric Milk Benefits: भारतीय घरांमध्ये ‘हळदीचे दूध’ हे हिवाळ्यातील हक्काचे आरोग्यदायी पेय म्हणून ओळखले जाते. थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला आणि सांधेदुखीवर घरगुती उपाय म्हणून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण याचे सेवन करतात. मात्र, हे औषधी दूध पिण्याची आपली पद्धत चुकीची असेल, तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
हळदीच्या दुधाचे महत्त्व आणि फायदे
दूध, हळद, मिरी, आले आणि दालचिनी यांचे मिश्रण असलेल्या या पेयामध्ये दाहशामक आणि जंतुनाशक गुणधर्म असतात.
- रोगप्रतिकारशक्ती: थंडीच्या दिवसात फ्लू आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते.
- वेदना निवारण: वृद्धांमध्ये संधिवात, सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी हे अत्यंत गुणकारी आहे.
- घशासाठी आराम: घशातील खवखव कमी करून शांत झोप लागण्यास मदत करते.
भारतीय घरांमध्ये होणारी ‘ही’ एक मोठी चूक
अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी लगेच हळदीचे दूध पिण्याची सवय असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही सवय पचनसंस्थेसाठी घातक ठरू शकते. रात्रीच्या वेळी आपली पचनक्रिया मंदावलेली असते. अशा वेळी कॅलरीयुक्त दूध प्यायल्याने पोट फुगणे, ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्यासारखे त्रास उद्भवू शकतात.
हळदीमधील ‘कर्करुमीन’ हे घटक पित्त उत्पादनास उत्तेजन देतात. जर तुम्ही जड जेवणानंतर लगेच दूध पिऊन झोपलात, तर आडवे झाल्यावर ‘ॲसिड रिफ्लक्स’ (अन्न नलिकेत ॲसिड येणे) चा त्रास होऊ शकतो.
दूध पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ
- वेळेचे अंतर: रात्रीचे जेवण आणि दूध पिण्यामध्ये किमान 1 ते 2 तासांचे अंतर ठेवा. झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी दूध घेणे केव्हाही उत्तम.
- रात्रीच्या जेवणापूर्वी: काही तज्ज्ञांच्या मते, जेवणापूर्वी दूध घेतल्यास भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- साखर टाळा: हळदीच्या दुधात साखरेचा वापर टाळावा. त्याऐवजी चिमूटभर काळी मिरी घातल्यास हळदीतील औषधी गुणधर्म शरीरात लवकर शोषले जातात.
- प्रमाण: हळदीचा वापर मर्यादित ठेवावा. तसेच ज्यांना दुधामुळे जडपणा जाणवतो, त्यांनी कमी फॅट असलेले दूध वापरावे.
हिवाळ्यात या छोट्या बदलांसह हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास आरोग्याला पूर्ण लाभ मिळतो आणि पचनाचे विकारही दूर राहतात.












