West Bengal Election 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरू असून, राज्याच्या राजकीय इतिहासात मोठे सत्तांतर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हाती आलेल्या ताज्या कलांनुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) ऐतिहासिक कामगिरी करत १९३ जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. तर गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) केवळ ९४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. भाजपच्या या एकतर्फी विजयाचे चित्र स्पष्ट होत असतानाच, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ संदेश जारी करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
“हा भाजपचा डाव; मतमोजणी केंद्र सोडू नका” – ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आवाहन-
भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतमोजणी प्रतिनिधींना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. “आपल्या कोणत्याही मतमोजणी प्रतिनिधीने किंवा उमेदवाराने कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी केंद्र सोडून बाहेर जाऊ नये. सुरुवातीच्या कलांमध्ये जाणीवपूर्वक भाजपला आघाडीवर दाखवले जाईल, असे मी कालपासूनच सांगत आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी भाजप हे सर्व जाणीवपूर्वक करत आहे,” असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
मतमोजणीत अनियमिततेचा आणि केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप-
ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आरोप केला की-
१. मशीन मधील आकडेवारीत तफावत: कल्याणी येथील मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनमधील आकडेवारीत मोठी तफावत आढळली असून तेथील आकडे जुळत नाहीत.
२. मतमोजणी रोखल्याचा दावा: भाजपच्या सांगण्यावरून अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या मतांची मोजणी जाणीवपूर्वक थांबवण्यात आली आहे.
३. केंद्रीय दलांचा दबाव: निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्रीय सुरक्षा दलांच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर सर्व बाजूंनी दबाव आणला जात आहे.
तृणमूलच्या बालेकिल्ल्याला खिंडार-
ममता बॅनर्जी यांनी कितीही गंभीर आरोप केले असले, तरी प्रत्यक्ष मतमोजणीच्या आकड्यांवरून पश्चिम बंगालमध्ये प्रस्थापितविरोधी लाट आल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या अनेक पारंपरिक बालेकिल्ल्यांना खिंडार पाडत बहुमताचा १४८ हा जादूई आकडा सहज ओलांडला आहे.
“निराश होण्याची मुळीच गरज नाही; सूर्यास्तानंतर आपलाच विजय निश्चित” – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धीर-
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भारतीय जनता पक्षाला मोठी आघाडी मिळताना दिसत असली, तरी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खचून न जाण्याचे आवाहन करत, रात्रीपर्यंत राजकीय चित्र बदलेल आणि तृणमूल काँग्रेसचाच विजय होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
“आम्ही १०० हून अधिक जागांवर आघाडीवर, पण आकडे लपवले जात आहेत”
ममता बॅनर्जी यांनी निवडणूक यंत्रणेवर आणि प्रसारमाध्यमांवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केला की, राजकीय दबावाखाली येऊन खरी आकडेवारी जनतेसमोर येऊ दिली जात नाही. “निवडणूक यंत्रणेच्या (SIR) माध्यमातून आमची मते चोरण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. असे असूनही, प्रत्यक्ष जमिनीवर आमचे उमेदवार १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. परंतु, दुर्दैवाने या आघाडीची कुठेही अधिकृत नोंद घेतली जात नाही. माध्यमांमध्ये आणि अधिकृत संकेतस्थळांवर चुकीचे आकडे प्रसिद्ध करून संभ्रम निर्माण केला जात आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे स्वतःच्या मर्जीनुसार आणि पक्षपातीपणे काम करत आहे,” असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
केंद्रीय दले आणि स्थानिक पोलिसांवर पक्षपाताचा ठपका-
आपल्या व्हिडिओ संदेशात ममता बॅनर्जी यांनी सुरक्षा यंत्रणांच्या भूमिकेवरही तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या इशाऱ्यावर केंद्रीय सुरक्षा दले काम करत आहेत. अत्यंत खेदाची बाब म्हणजे, राज्यातील स्थानिक पोलीस प्रशासनही स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी या केंद्रीय दलांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्याच सोबतीने काम करताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांना आणि मतमोजणी प्रतिनिधींना केंद्रांवर जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.
“अंतिम विजय आपलाच, कुणीही घाबरू नका!”
मतमोजणी केंद्रावरील तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला-
१. प्रक्रिया अजूनही प्रलंबित: “आतापर्यंत मतमोजणीच्या केवळ २ ते ४ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया १४ ते १८ फेऱ्यांपर्यंत चालते. त्यामुळे सुरुवातीचे कल पाहून कोणीही निराश होण्याची किंवा घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
२. सूर्यास्तानंतर चित्र बदलेल: “माझा राज्यातील जनतेवर आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या कष्टावर पूर्ण विश्वास आहे. जसा दिवस मावळेल आणि मतमोजणीच्या पुढच्या फेऱ्या सुरू होतील, तसे चित्र बदलेल. सूर्यास्तानंतर अंतिम विजय आपलाच होणार आहे,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
५ राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर महाराष्ट्रात भाजपचा जल्लोष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘महापरिवर्तना’चे प्रतिपादन-
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) देशभरात मोठा विजयोत्सव सुरू केला आहे. या विजयाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून मुंबईसह संपूर्ण राज्यात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ‘रसगुल्ला’ वाटून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत हा विजय केवळ पक्षाचा नसून सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या अथांग परिश्रमाचा असल्याचा गौरव केला.
“हा विजय म्हणजे महापरिवर्तन!” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-
मुंबईतील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या घवघवीत यशाचे विशेष कौतुक केले. त्यांनी बंगालच्या राजकारणाचा संदर्भ देत या विजयाला ‘महापरिवर्तन’ असे संबोधले. “मी जेव्हा पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात गेलो होतो, तेव्हा तिथल्या एका पत्रकाराने मला विचारले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नेहमी म्हणतात की भाजपचे लोक हे बंगालच्या बाहेरचे आहेत. त्यावर मी त्या पत्रकाराला थेट उत्तर दिले की, ज्यांनी भारतीय जनसंघाची आणि पर्यायाने भाजपची वैचारिक पायाभरणी केली, ते थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे स्वतः पश्चिम बंगालचेच सुपुत्र होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने बंगालची अस्मिता जपणारा पक्ष कोणता असेल, तर तो केवळ भारतीय जनता पक्षच आहे. आज बंगालच्या सुज्ञ जनतेने ममता दीदींना त्यांची जागा दाखवून दिली असून खऱ्या अर्थाने बंगालचा हक्काचा पक्ष कोणता, हे सिद्ध केले आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “बंगालच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर दृढ विश्वास दाखवला आहे. म्हणूनच तेथे केवळ ‘परिवर्तन’ झाले नसून, ते ‘महापरिवर्तन’ आहे.”
“हा राष्ट्रीयत्वाचा विजय” – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण-
याप्रसंगी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन केलेल्या परिश्रमाचे भरभरून कौतुक केले.
१. ६ हजार कार्यकर्त्यांचे योगदान: “महाराष्ट्रातून जवळपास ६ हजार बंगाली भाषिक आणि इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन रात्रंदिवस मेहनत घेतली. या सर्व कार्यकर्त्यांनी तेथील स्थानिक जनतेशी संवाद साधत भाजपची विचारधारा पोहोचवली. त्यांच्या या निस्वार्थी परिश्रमाचे फळ आज आपल्याला या निकालांच्या रूपाने पाहायला मिळत आहे,” असे चव्हाण म्हणाले.
२. मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब: हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाला देशातील जनतेने दिलेली पावती आहे. हा केवळ एका राजकीय पक्षाचा विजय नसून, देशात पुन्हा एकदा प्रखर राष्ट्रीयत्वाचा विजय झाला आहे, असे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले.
“हा तर मोदींवरील विश्वासाचा विजय” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर प्रहार-
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित विजयोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरी या राज्यांमध्ये पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि जनतेच्या विश्वासाला दिले. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात मुख्यमंत्री फडणवीस यांनी “मोदी है तो मुमकीन है” अशी घोषणा देत उपस्थितांमध्ये नवा उत्साह भरला.
“हा केवळ भाजपचा नाही, तर संपूर्ण भारताचा विजय”-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात या निवडणूक निकालांचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, हा विजय केवळ भारतीय जनता पक्षाचा नसून प्रखर राष्ट्रवादाचा आणि पर्यायाने संपूर्ण भारताचा विजय आहे.”आसाम, पद्दुचेरी आणि विशेषतः पश्चिम बंगालमधील हा विजय भारतीय जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. आजही देशातील जनतेला एकच गोष्ट चांगली ठाऊक आहे की, ‘मोदी आहेत तरच सर्व काही शक्य आहे.’ आसाम राज्याप्रमाणेच आता पश्चिम बंगाल देखील भारताच्या आगामी विकास प्रवासात अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची भूमिका बजावेल,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
बंगालमधील ६ दशकांच्या ‘कुशासनाचा’ अंत-
पश्चिम बंगालमधील राजकीय सत्तांतरावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूतकाळातील राज्यकर्त्यांवर तीव्र टीका केली. बंगालच्या सद्यस्थितीला पूर्वीचे राज्यकर्तेच कसे जबाबदार होते, याचा पाढा त्यांनी वाचला.
१. ऐतिहासिक कुशासन: “पश्चिम बंगालमधून कुशासन आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम तेथील जनतेने केले आहे. बंगालमध्ये यापूर्वी तब्बल ३० वर्षे काँग्रेसने आणि ३६ वर्षे कम्युनिस्ट पक्षाने सत्ता उपभोगली. या ६६ वर्षांच्या काळात त्यांनी बंगालची मोठी हानी केली,” असे फडणवीस म्हणाले.
२. ममता बॅनर्जींवर थेट निशाणा: “या दोन्ही पक्षांपेक्षाही अधिक खतरनाक शासन गेल्या १५ वर्षांत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने चालवले. या सर्व राज्यकर्त्यांनी मिळून एकेकाळी देशाचे सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्र असलेल्या बंगालची अवस्था अत्यंत बिकट करून ठेवली होती,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
५ राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय कलगीतुरा: भाजप नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, तर संजय राऊतांचा गंभीर आरोप-
देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे आणि काँग्रेसच्या झालेल्या पीछेहाटीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. भाजप नेत्यांनी या विजयाचे स्वागत करत काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी या निकालांवर संशय व्यक्त केला आहे.
“काँग्रेस हा आता नेतृत्वहीन पक्ष” – खासदार अशोक चव्हाण-
काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या दारुण पराभवावरून त्यांच्यावर घणाघाती टीका केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. “पाच राज्यांच्या या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला असून, ममता बॅनर्जी यांची गेल्या १५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक चांगल्या निर्णयाला विरोध करण्याचे राजकारण केले, पण सुज्ञ मतदारांनी या अपप्रचाराला भीक घातली नाही. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यामुळे महिला मतदारांचा विरोधकांवर मोठा रोष होता, ज्याचा फटका तृणमूल काँग्रेसला बसला,” असे अशोक चव्हाण म्हणाले.
त्यांनी पुढे नमूद केले की, “ऑपरेशन सिंदूर’बाबत विनाकारण शंका उपस्थित करणाऱ्यांना आणि परदेशी नेत्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवून स्वतःच्याच देशाविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्यांना या निकालांनी चोख उत्तर दिले आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काँग्रेसचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. काँग्रेस हा आता पूर्णपणे नेतृत्वहीन पक्ष झाला असून, या पराभवातून तरी त्यांनी आता शहाणपण शिकावे.”
“बंगालच्या विजयाने देशातील अनेक प्रश्न सुटणार” – विनोद तावडे
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी या विजयाचे विश्लेषण करताना पश्चिम बंगालमधील सत्तांतराला अत्यंत महत्त्वाचे ठरवले. ते म्हणाले की, तुष्टीकरणाचे राजकारण फार काळ टिकत नाही, तर केवळ विकासाचेच राजकारण चालते, हे बंगालच्या जनतेने दाखवून दिले आहे.
इतर राज्यांतील कामगिरी: “आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार येत आहे, तर पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडी बहुमताकडे आहे. केरळमध्ये भाजप आपले खाते उघडत असून पक्षाची मतांची टक्केवारी सातत्याने वाढत आहे. तामिळनाडूमध्येही भाजपच्या जागा वाढल्या असून तेथील अँटी-इन्कम्बन्सीचा (प्रस्थापितविरोधी लाट) फटका दोन्ही प्रमुख पक्षांना बसला आहे.”
बंगालचे भौगोलिक महत्त्व: “आजचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा विजय पश्चिम बंगालमधील आहे. बंगाल केवळ एक राज्य नसून तो एक संवेदनशील सीमावर्ती प्रदेश आहे. तेथून मुंबईपर्यंत बांगलादेशी घुसखोर येतात आणि स्थानिक उद्योग-व्यवसायांवर ताबा मिळवतात. बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यामुळे घुसखोरी थांबेल आणि आपल्या देशाचे अंतर्गत सुरक्षेशी संबंधित अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल,” असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
“दिवा विझताना मोठा होतो, हा सरळ मार्गाने मिळालेला विजय नाही” – संजय राऊत
भाजप नेत्यांच्या या दाव्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. त्यांनी या निकालांमागे गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त करत भाजपवर गंभीर आरोप केले. “पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झालेला विजय हा सरळ मार्गाने मिळालेला नाही. दिवा विझण्यापूर्वी जसा मोठा होतो, तशीच ही भाजपची स्थिती आहे. आता त्यांचे कार्य संपत आले आहे. बंगालमध्ये अजूनही ३० ते ३५ मतमोजणी केंद्रांवर मोजणी थांबवण्यात आली आहे, तर अनेक केंद्रांवर भाजपचे कार्यकर्ते गोंधळ घालत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) मदत भाजप कार्यकर्त्यांना मिळत आहे,” असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.










