Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई आणि पुण्याला जोडणारा राज्यातील सर्वात महत्त्वाचा महामार्ग सध्या प्रवाशांसाठी एक ‘अग्निपरीक्षा’ ठरला आहे. अडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण टँकर अपघातामुळे आणि त्यानंतर सुरू झालेल्या गॅस गळतीमुळे गेल्या २४ तासांपासून हा मार्ग ठप्प आहे. या वाहतूक कोंडीचे जे ‘एरिअल व्ह्यू’ (Aerial View) समोर आले आहेत, ते अंगावर काटा आणणारे आहेत.
खंडाळा घाटातील नागमोडी वळणांवर किलोमीटर्सपर्यंत केवळ वाहनांच्या रांगा दिसत असून, हा महामार्ग नसून जणू वाहनांचा एखादा महाकाय अजगरच आहे की काय, असा भास होत आहे.
घाटात हजारो कुटुंबं अडकली; २४ तासांपासून अन्नाविना हाल
प्रवासाला निघालेल्या हजारो कुटुंबांना आपली रात्र महामार्गावरच काढावी लागली आहे. लोणावळ्यापासून ते थेट खालापूर टोलपर्यंत वाहनांची जत्रा भरल्याचे चित्र आहे. या महाकाय कोंडीत अडकलेली वाहने इंच-इंच पुढे सरकत आहेत. गॅस गळती अत्यंत धोकादायक असल्याने आणि एका लहानशा ठिणगीमुळे मोठा स्फोट होण्याची भीती असल्याने प्रशासनाने कोणतीही घाई न करता खबरदारीचे सर्व उपाय योजले आहेत.
A 20+ hour traffic jam on Mumbai Pune Highway. As per the government's own estimates apart from private vehicles 163 state transport buses have also been stuck. Think of the plight of women and children who have been stuck like this for hours.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 4, 2026
Last year we had seen a massive… pic.twitter.com/izXGLqFMHs
नुकताच अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात यश आले असले तरी, रस्ता पूर्णपणे मोकळा होण्यासाठी अजूनही काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
प्रवाशांच्या नरकयातना आणि पालकांची वणवण
महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना सध्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
- मुलांचे हाल: तासनतास अडकल्यामुळे लहान मुलांच्या खाण्यापिण्याचे हाल होत असून पालकांना अन्नासाठी वणवण करावी लागत आहे.
- पाणी आणि इंधन: पिण्याच्या पाण्याचा साठा संपला आहे. तासनतास एसी आणि लाईट्स सुरू ठेवल्यामुळे अनेक गाड्यांमधील इंधन संपले असून, काही वाहने रस्त्यावरच बंद पडली आहेत.
- महिलांची कुचंबणा: घाटात कोणतीही प्रसाधनगृहांची सोय नसल्याने महिला प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मदतकार्यात अडथळे
हायवे पोलीस मोटरसायकलवरून प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु वाहनांची संख्या इतकी प्रचंड आहे की ही मदत अपुरी पडत आहे. मुंबई-पुणे मार्गावर दोन्ही बाजूंना साधारण ४० ते ५० किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून, इतकी भयंकर वाहतूक कोंडी याआधी कधीही पाहण्यात आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. प्रशासनाकडून सध्या प्रवाशांना धीर धरण्याचे आणि शक्य असल्यास जुन्या महामार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.









