Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी महिला व बालविकास विभागाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुकांमुळे अनेक पात्र महिलांचे मानधन रखडले होते. या पार्श्वभूमीवर, शासनाने ई-केवायसी दुरुस्तीसाठीचे पोर्टल पुन्हा एकदा सुरू केले असून, येत्या ३१ मार्च २०२६ पर्यंत महिलांना आपल्या अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य होते. मात्र, आधार प्रमाणीकरण करताना अनेक लाभार्थी महिलांकडून तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले. विशेषतः “कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत किंवा निवृत्तीवेतनधारक नसावा” या निकषाबाबतचा पर्याय निवडताना अनेक महिलांनी अनवधानाने चुकीची माहिती भरली होती. या एका चुकीच्या निवडीमुळे हजारो पात्र महिलांचे नाव तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले होते आणि त्यांचे हप्ते थांबले होते. या तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील विविध भागांत महिलांनी संताप व्यक्त करत मोर्चेही काढले होते.
क्षेत्रीय कार्यालयांकडून आलेला अहवाल आणि लाभार्थी महिलांची मागणी लक्षात घेऊन, राज्य सरकारने २० जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याचे निर्देश दिले होते. आता ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि पात्र महिलांना त्वरित लाभ मिळावा, यासाठी ऑनलाईन पोर्टलवर सुधारणेचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या महिलांनी पूर्वी चुकीचा पर्याय निवडला होता, त्या आता आपल्या अर्जात योग्य सुधारणा करून पुन्हा एकदा पात्र ठरू शकणार आहेत.
दरम्यान, डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ जानेवारी रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील कोट्यवधी महिलांना लागून राहिली आहे. यासोबतच, महायुती सरकारने निवडणूक काळात या योजनेची व्याप्ती वाढवून मानधनाची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आश्वासन आणि प्रलंबित हप्त्यांचे वितरण यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.









