Home / महाराष्ट्र / EVM Issue Cases : राज्यात ६० हून अधिक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

EVM Issue Cases : राज्यात ६० हून अधिक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

EVM Issue Cases : राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या या...

By: Team Navakal
EVM Issue Cases
Social + WhatsApp CTA


EVM Issue Cases : राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला असला, तरी अनेक ठिकाणी निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदारांना बसला. राज्यभरात ६० हून अधिक मतदान केंद्रांवर ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने निवडणूक प्रशासनाच्या सज्जतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चिपळूण तालुक्यात तांत्रिक बिघाडाचा महापूर
निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक अडथळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पाहायला मिळाले. तालुक्यातील सुमारे ४० ते ४५ केंद्रांवर मतदान यंत्रे अचानक बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला.

खोळंबलेली प्रक्रिया: खेर्डी जिल्हा परिषद गटातील पाच केंद्रांवर यंत्रे निकामी झाल्याने मतदारांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागले. शिरगाव येथे सकाळी दोन यंत्रे तासभर बंद होती, तर सावर्डे कॉलनीमध्ये सकाळी ९ वाजताच यंत्रात बिघाड झाला.

मतदारांचा संताप: पिंपळ मोहल्ला, कुडप, कापरे, कापसाळ, कळंबस्ते आणि पेढांबे यांसह अनेक गावांमध्ये बिघाडाची मालिका सुरूच होती. दीर्घकाळ वाट पाहूनही यंत्रे सुरू न झाल्याने अनेक मतदारांनी संताप व्यक्त करत मतदान न करताच घरचा रस्ता धरला.

मालघरमध्ये ‘शाई’चा अनाकलनीय प्रकार
चिपळूणमधील मालघर येथे एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली. येथे मतदारांच्या बोटावर लावलेली शाई लावल्यानंतर काही वेळातच आपोआप पुसली जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे बोगस मतदानाच्या शक्यतेने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यभरातील अन्य जिल्ह्यांतील स्थिती-
केवळ चिपळूणच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतून तांत्रिक अडचणींच्या तक्रारींचा ओघ सुरू होता:

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र- रायगड जिल्ह्यातील अलिबाग (सहाण केंद्र) येथे मतदान सुरू होण्यापूर्वीच यंत्रात बिघाड झाला. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर आणि सातारा जिल्ह्यातील कराडमधील चचेगाव येथेही सुरुवातीच्या काळात मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती. सांगलीतील चिकुर्डे गटातही देवर्डे केंद्रावर काही काळ मतदान थांबले होते.

छत्रपती संभाजीनगर- वाळूज येथील मतदान केंद्रावर दोन यंत्रे बदलावी लागली. बुथ क्रमांक १५ मधील यंत्र काही काळ बंद असल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

धाराशीव- तुळजापूर तालुक्यातील शिंदफळ गटातील शिरढोण येथे यंत्रातील बिघाडामुळे मतदानाला विलंब झाला.

निवडणूक यंत्रणेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह
मतदान ही लोकशाहीतील अत्यंत संवेदनशील प्रक्रिया असताना, इतक्या मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड होणे हे निवडणूक आयोगाच्या पूर्वतयारीतील उणिवा दर्शवणारे आहे. विशेषतः ग्रामीण भागात तांत्रिक मदतीसाठी आवश्यक असणारे फिरते पथक (Mobile Team) वेळेत पोहोचू न शकल्याने मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या