Home / देश-विदेश / Indian Passport Fees Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका; 14 वर्षांनंतर पासपोर्टच्या किमतीत झाली प्रचंड वाढ! 1 जुलैपासून मोजावे लागणार जास्त पैसे

Indian Passport Fees Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका; 14 वर्षांनंतर पासपोर्टच्या किमतीत झाली प्रचंड वाढ! 1 जुलैपासून मोजावे लागणार जास्त पैसे

Indian Passport Fees Hike: परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. केंद्र सरकारने तब्बल...

By: Team Navakal
Indian Passport Fees Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका; 14 वर्षांनंतर पासपोर्टच्या किमतीत झाली प्रचंड वाढ! 1 जुलैपासून मोजावे लागणार जास्त पैसे
Social + WhatsApp CTA

Indian Passport Fees Hike: परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. केंद्र सरकारने तब्बल 14 वर्षांनंतर पासपोर्टच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 1 जुलैपासून देशात नवीन पासपोर्ट काढणे आणि त्याचे नूतनीकरण करणे महाग होणार आहे.

विशेष म्हणजे, सरकारने पासपोर्ट हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसून ते केवळ परदेश प्रवासासाठीचे अधिकृत दस्तऐवज आहे, असे स्पष्ट केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय जाहीर केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट नियम 2026 अंतर्गत नवीन सुधारित शुल्क रचनेची अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी शेवटची मोठी दरवाढ 2012 मध्ये करण्यात आली होती, जेव्हा सामान्य पासपोर्टचे शुल्क 1,000 रुपयांवरून 1,500 रुपये करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा या किमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

नॉर्मल आणि तात्काळ श्रेणीतील नवीन शुल्क रचना खालीलप्रमाणे:

१८ वर्षांवरील प्रौढ नागरिकांसाठी आता पासपोर्टच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार खालीलप्रमाणे नवीन शुल्क आकारले जाईल:

  • ३६ पानांचा नवीन किंवा नूतनीकरण पासपोर्ट: सामान्य श्रेणीत यासाठी आता 1,500 रुपयांऐवजी 2,500 रुपये मोजावे लागतील. तर तात्काळ श्रेणीत हे शुल्क 3,500 रुपयांवरून थेट 5,000 रुपये करण्यात आले आहे.
  • ६० पानांचा जम्बो पासपोर्ट: सामान्य श्रेणीत ६० पानाच्या पासपोर्टसाठी 2,000 रुपयांऐवजी 3,500 रुपये द्यावे लागतील. तसेच तात्काळ श्रेणीसाठी हे शुल्क 4,000 रुपयांवरून वाढवून 6,000 रुपये करण्यात आले आहे.

हरवलेला पासपोर्ट आणि अल्पवयीन मुलांसाठीचे सुधारित दर

जर तुमचा पासपोर्ट हरवला असेल, खराब झाला असेल किंवा तुम्ही अल्पवयीन असाल, तर नवीन नियमांनुसार खालील खर्च येईल:

  • पासपोर्ट हरवल्यास किंवा खराब झाल्यास: 36 पानांचा नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी सामान्य श्रेणीत 5,000 रुपये आणि तात्काळसाठी 7,500 रुपये मोजावे लागतील. ६० पानाच्या पासपोर्टसाठी सामान्य श्रेणीत 6,000 रुपये आणि तात्काळसाठी 8,500 रुपये शुल्क निश्चित केले आहे.
  • १८ वर्षांखालील मुलांसाठी (मायनर्स): 36 पानांच्या नवीन किंवा नूतनीकरण केलेल्या पासपोर्टसाठी सामान्य श्रेणीत 1,750 रुपये आणि तात्काळमध्ये 4,250 रुपये लागतील. मुलांचा पासपोर्ट हरवल्यास तो पुन्हा मिळवण्यासाठी सामान्य श्रेणीत 4,250 रुपये आणि तात्काळमध्ये 6,750 रुपये द्यावे लागतील.

इतर सेवा आणि इतर प्रमाणपत्रांचे शुल्कही बदलले

परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट कायद्याच्या कलम २४ अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार इतरही काही महत्त्वाच्या सेवांचे दर बदलले आहेत:

  • पोलीस पडताळणी (PCC) आणि इतर सेवा: पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, सरेंडर सर्टिफिकेट आणि ग्लोबल एंट्री प्रोग्राम पडताळणीसाठी आता भारतात 750 रुपये आणि परदेशात 40 डॉलर शुल्क आकारले जाईल.
  • ओळख प्रमाणपत्र: भारतात ओळख प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 1,000 रुपये खर्च येईल, तर परदेशात यासाठी 50 डॉलर द्यावे लागतील.
  • आणीबाणी प्रमाणपत्र (इमर्जन्सी सर्टिफिकेट): हे प्रमाणपत्र भारताच्या आत पूर्णपणे मोफत दिले जाईल, मात्र परदेशात राहणाऱ्या अर्जदारांकडून यासाठी 15 डॉलर आकारले जातील.

१ जुलै किंवा त्यानंतर सबमिट केल्या जाणाऱ्या सर्व नवीन पासपोर्ट अर्जांना ही नवीन शुल्क रचना लागू होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या