BJP : महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी, पळवापळवी, पक्ष गायब, चिन्ह दुसर्याच्या हाती, पहाटेचा शपथविधी, दुखवट्याच्या चौथ्या दिवशी शपथविधी असा सगळा चिखल झाल्यानंतर आता विधानसभेपासून पंचायत समितीपर्यंत फक्त आणि फक्त कमळ फुलले आहे. कमळ हे लक्ष्मीचे वाहन आहे. दोन्ही भाजपाची (BJP)प्रतिक बनली आहेत. भाजपाच्या कमळांची संख्या पाहून त्यांच्या पाठीवर राहणारा शिंदे गट आणि अजित पवार गट हे कायम गॅसवर राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊनही मशाल विझलीच आणि इंजिन यार्डात गेले. दोघे भाऊ मुंबईच्या सत्तेसाठी मुंबईत ठाण मांडून बसले, पण मुंबई हातातून गेली आणि ग्रामीण भागही हाती राहिला नाही. काँग्रेसचे बळ ग्रामीण भागात होते, त्या हाताला आता कुणी म्हणाले होते त्याप्रमाणे लकवा मारला आहे, तुतारी आता बोटांवर मोजण्याइतकी आणि पूर्ण शक्तीहिन राहिली आहे. महाराष्ट्राची पुढची वाटचाल मतदारांनी कमळाच्या हाती दिली आहे.
राज्यातील 12 जि.प. आणि 125 प.स. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला तर शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाला दुसर्या व तिसर्या क्रमांकाचे यश मिळाले. महायुतीला राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेने कौल दिला. विरोधकांना पुन्हा एकदा मोठा तडाखा बसला असून, ससेहोलपट सुरूच आहे.सर्वसाधारणपणे राज्यात ज्याची सत्ता त्यालाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान करण्याकडे मतदारांचा कल असतो, ते या निवडणूक निकालांवरून पुन्हा एकदा दिसून येत आहे. भाजपाने जि.प. निवडणुकीत द्विशतकी टप्पा पार केला तर शिंदे सेना आणि अजित पवार गट यांनी शतकी पल्ला पार केल्याने पुन्हा एकदा महायुतीला जनतेने स्पष्ट कौल दिल्याचे दिसत आहे. मविआमध्ये काँग्रेस सर्वात मोठा म्हणजे अर्धशतकी पल्ला पार करणारा पक्ष ठरला असून, त्यानंतर उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गट असे त्यामागून क्रमांक लागतात.
विविध नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्या होत्या. सिंधुदुर्गात भाजपाने घवघवीत यश मिळवले. येथे महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला होता. अनेक ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आले होते. तसे पाहिले तर मंत्री नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. स्वत: नारायण राणे यांनी पुढाकार घेऊन जागावाटप केले होते. भाजपा येथे पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला तर शिंदे सेना दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला. विरोधकांचे आव्हान निवडणुकीत दिसलेच नाही.रत्नागिरी हा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गड मानला जातो. येथे शिंदे सेनेने वर्चस्व सिद्ध केले. निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका कुणाला बसणार हा एक मुद्दा होता व त्यातच जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाल्याची नोंदही झाली होती. मात्र आज समोर आलेल्या निकालांनी शिंदे सेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे.
रायगड जिल्ह्यात महायुतीचे तिन्ही पक्ष आमनेसामने होते. येथे मंत्री भरत गोगावले आणि खा.सुनील तटकरे यांच्यात खरा मुकाबला होता. पालकमंत्रिपदावरून दोघांमध्ये ताणलेले संबंध या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरला होता. मात्र शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात चुरस झाली. भाजपा येथे तिसर्या स्थानावर राहिला. उबाठाचे या निवडणुकीत जसे नुकसान झाले तसेच एकेकाळचा रायगडमधील मोठा पक्ष असलेल्या शेकापला तर पुरती घरघर लागली. रायगडमधील पंचायत समित्यांमध्ये शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा वरचष्मा दिसत आहे.
सातार्यात भाजपाच्या प्रचाराची धुरा मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अतुल भोसले, रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यावर होती तर शिंदे सेनेनेही सातारा जिल्ह्यात तगडी लढत दिली. मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी शिंदे सेनेकडून किल्ला लढवला. भाजपा पहिल्या आणि अजित पवार गट येथे दुसर्या स्थानावर तर शिंदे सेना तिसर्या स्थानी राहिली. स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक लढली गेली होती. येथे भाजपाला 44, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10 व शिंदे सेनेला 7 जागा मिळाल्या. सातार्यातील पंचायत समित्यांमध्ये खंडाळा, वाई, सातारा येथे राष्ट्रवादी अजित पवार गट, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, जावळी व कराड येथे प्रत्येकी भाजपा तर महाबळेश्वर आणि पाटणमध्ये शिंदे सेनेने आपला झेंडा फडकवला.
पुण्यात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने सर्वाधिक जागा पटकावल्या. तर त्यापाठोपाठ भाजपा व शिंदे सेना यांना जागा मिळाल्या. पुण्यातील पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून आले.पक्षाने जुन्नर, आंबेगाव, नवल मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती, इंदापूर या पंचायत समित्या काबीज केल्या तर भाजपाने शिरूर, दौंड व भोर येथे झेंडा फडकवला.
लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून, त्यांनी जि.प. निवडणुकीत 59 जागांपैकी 23 जागा जिंकल्या. भाजपाला 18, राष्ट्रवादी अजित पवार गट 12, शिंदे सेना, उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार व मनसे प्रत्येकी 1 आणि अपक्ष 2 असे पक्षीय बलाबल आहे. पंचायत समित्यांमध्ये अहमदपूर, जळकोट, उदगीर येथे राष्ट्रवादी अजित पवार गट तर चाकूर, रेणापूर, लातूर येथे काँग्रेसने सत्ता मिळवली, त्याशिवाय शिरूर अनंतपाळ, देवणी, ओसा, निलंगा येथे भाजपाला यश मिळाले. धाराशिवमध्ये जि.प. निवडणुकीत भाजपा व शिंदे सेना यांच्यात चुरस आहे. या निवडणुकीत महायुती काही जागांवर एकत्रित लढली तर काही ठिकाणी चुरस पाहायला मिळाली. आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर व तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती. पंचायत समित्यांमध्ये परंडा, भूम, वाशी लोहारा या तालुक्यात शिंदे सेनेला यश मिळाले तर कळंब आणि तुळजापूर भाजपाने आणि धाराशिव व उमरगा उबाठाने जिंकल्या.
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती करण्यावरून वादावादी आणि दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचे आक्रमक रूप पाहता स्थानिक नेत्यांची खरी कसोटी लागली होती. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार तसेच आम. अनुराधा चव्हाण यांनी या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. भाजपा आणि शिंदे सेना यांच्यात जि.प.साठी चुरस रंगली तर पंचायत समित्यांमध्ये सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद येथे भाजपाने यश मिळवले असून, शिंदे सेनेने सिल्लोड, कन्नड, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पैठण येथे झेंडा रोवला. राष्ट्रवादी अजित पवार गटाला गंगापुरात यश मिळाले.
परभणीमध्ये मेघना बोर्डीकर या पालकमंत्री असून, त्यांच्याबरोबरच सुरेश वरपुडकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली. पैकी सुरेश वरपुडकर यांना मतदारांनी चांगलाच धक्का दिला. जि.प.मध्ये. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाला येथे दुसर्या क्रमांकाचे यश मिळाले. पंचायत समिती निवडणुकीत जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पूर्णा, पालम गंगाखेड येथे भाजपाने मोठे यश मिळवले तर पाथरीमध्ये शिंदे गट आणि सोनपेठमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा फडकला.
सांगलीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेस यांच्यात जिल्हा परिषद निवडणुकीची चुरस रंगली. पंचायत समिती निवडणुकांमध्ये आटपाडी, खानापूर (विटा) या शिंदे सेनेने तर जत व मिरज भाजपाने मिळवल्या, कवठे महाकाळ, वाळवा ईश्वरपूर पंचायत समित्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने तासगाव व शिराळा येथे यश मिळवले.
सोलापूर जि.प. मध्ये महायुतीने मोठे यश मिळवले असून, भाजपा त्यात मोठा भाऊ आहे तर पंचायत समित्यांमध्ये करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट येथे भाजपाने यश मिळवले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला माढा पंचायत समिती मिळाली. कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाने हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारली असून, सर्वाधिक म्हणजे 20 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसला 15 व भाजपाला 11 जागांवर समाधान मानावे लागले. शिंदे सेनेला येथे 9 जागा मिळाल्या.जनसुराज्यने 5 जागांवर यश मिळवले. अशा प्रकारे महायुतीला येथे 41 जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषद – 12
भाजपा – 7
शिंदे गट – 2
अ. पवार गट – 2
शरद पवार गट – 1
काँग्रेस – 0
उबाठा – 0
इतर – 0
पंचायत समिती- 125
भाजपा – 52
शिंदे गट – 26
अ. पवार गट – 25
शरद पवार गट – 08
काँग्रेस – 08
उबाठा – 05
इतर – 01
हे देखील वाचा –
शरद पवारांची प्रकृती खालावली; बारामतीहून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल
“भारताच्या बाबतीतही हेच नियम लावले असते का?”, आयसीसीच्या निर्णयावर नासेर हुसेन संतापले










