Gen MM Naravane Book Controversy: भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या ‘Four Stars of Destiny’ या आत्मचरित्रावरून सध्या देशात मोठे राजकीय आणि कायदेशीर युद्ध सुरू झाले आहे. हे पुस्तक अद्याप अधिकृतपणे प्रकाशित झाले नसले तरी, त्याची पीडीएफ प्रत सोशल मीडियावर लीक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दखल घेतली असून, ‘स्पेशल सेल’कडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक संकेतस्थळांवर या पुस्तकाची पूर्व-मुद्रित प्रत उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकाला अद्याप संरक्षण मंत्रालयाने किंवा संबंधित यंत्रणांनी हिरवा कंदील दिलेला नाही.
पेंग्विन रँडम हाऊस या प्रकाशन संस्थेने तयार केलेली एक पीडीएफ फाईल काही प्लॅटफॉर्मवर अनधिकृतपणे फिरत असून, काही ई-कॉमर्स साईट्सवर त्याचे कव्हर पेजही दिसत आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलिसांनी ‘कॉपीराईट’ आणि ‘अधिकृत परवानग्यांच्या उल्लंघना’चा गुन्हा नोंदवला आहे.
संसदेत राहुल गांधींनी दाखवली प्रत
या पुस्तकाचा वाद केवळ पोलिसांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाची एक प्रत हातात घेऊन सरकारवर निशाणा साधला. “सरकार म्हणतंय की हे पुस्तक अस्तित्वात नाही, पण बघा हे इथे आहे,” असे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या या कृतीमुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि परिणामी ८ खासदारांना निलंबितही करण्यात आले.
पुस्तकात असे काय आहे?
जनरल नरवणे यांचे हे पुस्तक गेल्या १ वर्षापासून संरक्षण मंत्रालयाच्या पुनरावलोकनाखाली आहे. या पुस्तकात २०२० मधील गलवान संघर्ष आणि अग्निपथ योजना यांसारख्या संवेदनशील विषयांवर भाष्य करण्यात आले असल्याचे बोलले जाते. २० भारतीय जवान शहीद झालेल्या गलवान संघर्षादरम्यानचे काही अंतर्गत तपशील या पुस्तकात असल्याने सरकारने अद्याप याला परवानगी दिलेली नाही.
प्रकाशन संस्थेचा खुलासा
पेंग्विन रँडम हाऊसने स्पष्ट केले आहे की, त्यांनी या पुस्तकाची कोणतीही प्रत अद्याप बाजारात आणलेली नाही. सध्या इंटरनेटवर जे काही उपलब्ध आहे, ते पूर्णपणे अनधिकृत आहे. जनरल नरवणे यांनीही यापूर्वी सांगितले होते की, पुस्तक लिहिणे हे माझे काम होते, आता परवानगी मिळवणे हे प्रकाशक आणि संरक्षण मंत्रालयाचे काम आहे.









