Epstein Files Controversy : लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव वादग्रस्त ‘एपस्टीन फाइल्स’शी जोडल्यानंतर पुरी यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी आपला कोणताही वैयक्तिक किंवा गुन्हेगारी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नेमका काय आहे हरदीप पुरी यांचा खुलासा?
हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, ज्या काळात ते न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते, तेव्हा ते आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या (IPI) एका आयोगाचे सदस्य होते. याच संस्थेतील वरिष्ठ सहकाऱ्यांमार्फत त्यांची एपस्टीनशी ओळख झाली होती. ते म्हणाले, “मी एपस्टीनला केवळ 3 ते 4 वेळा एका शिष्टमंडळाचा भाग म्हणून भेटलो होतो. आमची भेट निव्वळ व्यावसायिक स्वरूपाची होती आणि त्याचा एपस्टीनवर असलेल्या गुन्ह्यांशी कोणताही संबंध नाही.”
“राहुल गांधींनी पूर्ण ईमेल वाचायला हवा”
हरदीप पुरी यांनी यावेळी राहुल गांधींवर निशाणा साधताना सांगितले की, अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित 30 लाख कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. त्यामध्ये माझ्या संदर्भात केवळ दोन ते तीन संदर्भ आहेत. एका ईमेलचा दाखला देत पुरी म्हणाले, “मी लिंकडइनच्या माजी प्रमुखांशी भारताच्या इंटरनेट संधींबाबत चर्चा करत होतो, त्या ईमेलमध्ये एपस्टीनला केवळ ‘सीसी’ (CC) करण्यात आले होते. राहुल गांधींनी हे ईमेल नीट वाचायला हवेत, कारण एपस्टीननेच मला एकदा ‘दोन तोंडी’ म्हटले होते, कारण माझा त्यांच्या उपक्रमांत रस नव्हता.”
हरदीप पुरी यांनी स्पष्ट केले की, ८ वर्षांच्या कालावधीत केवळ मोजक्याच भेटी झाल्या आणि त्याही केवळ आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून होत्या. या स्पष्टीकरणामुळे आता राहुल गांधी आणि काँग्रेस यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे एपस्टीन फाइल्सचा वाद?
जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक मोठा फायनान्सर होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या तस्करीचे आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये जगातील अनेक बड्या नेत्यांची आणि सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. राहुल गांधी यांनी याच फाइल्सचा आधार घेत संसदेत हरदीप पुरींचे नाव घेतले होते.










