Tipu Sultan : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न होऊन उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद या विराजमान झाल्या आणि त्यांनी पालिकेतील आपल्या कार्यालयात टिपू सुलतान यांची तस्वीर लावली. ही तस्वीर दिसताच प्रचंड वाद सुरू झाला. भाजपाने जोरदार विरोध केला आणि ही तस्वीर काढायला लावली. यामुळे वातावरण शांत होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महामानवाच्या तस्वीरी लावण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची समान तुलना केल्याचा आरोप झाला आणि पुन्हा वातावरण पेटले, अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर आज भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राज्यभर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. पुण्यातील काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेकही केली.
म्हैसूरचा शासक टिपू सुलतान यांच्याबाबत सातत्याने वाद सुरू असतो. काँग्रेस आणि काही पक्षाचे मत आहे की टिपू सुलतान हे ब्रिटिशांविरोधात लढले. यामुळे त्यांचा सन्मान झाला पाहिजे. तर भाजपाची ठाम भूमिका आहे की, टिपू सुलतान यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतरे केली, हिंदूंची देवळे पाडली. यामुळे टिपू सुलतानचा कोणत्याही प्रकारे आदर होता कामा नये. या विरोधी भूमिकांमुळे सतत वाद आणि आंदोलने होत असतात. 2016 साली कर्नाटकातील काँग्रेस सरकारने टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याचा शासकीय निर्णय घेतला. त्यावेळीही भाजपाने याविरोधात मोठे आंदोलन उभारले. अखेर 2021 साली भाजपाचे सिद्धरामय्या सरकार कर्नाटकात
सत्तेवर आल्यानंतर ही जयंती साजरी करण्याचा शासकीय आदेश रद्द करण्यात आला. 2021 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मिरा-भाईंदरचे शिवसेनेचे नेते सलमान हाशमी यांनी टिपू सुलतान यांच्या जयंतीचे पोस्टर जारी केले होते. 2023 साली फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांनी काही कोटी रुपये देऊन टिपू सुलतान यांची तलवार लिलावात विकत घेतली आणि ती भारतात आणण्याची घोषणा केली तेव्हाही असाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळीही भाजपा रस्त्यावर उतरली होती. आता महाराष्ट्रात पुन्हा हा वाद उफाळून आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समान महत्त्व असल्याचे म्हटल्याचा आरोप करीत भाजपाने आज राज्यभर आंदोलन केले. ठिकठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या बॅनरला काळे फासले, पुण्यात काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजपाने राज्यात मुंबई, पुणे नाशिक, संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, नांदेड, सांगली, अहिल्यानगर याठिकाणी आंदोलने केली. मराठा ठोक मोर्चा संघटनेचे समन्वयकमहेश डोंगरे यांनी सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणार्याला लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तर सपकाळ यांनी एपस्टिन फाइलमधील माहिती बाहेर येऊ नये म्हणून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत उलट प्रहार केला. विशेष म्हणजे, भाजपाचे रामनाथ कोविंद देशाचे राष्ट्रपती असताना त्यांनी 2017 मध्ये टिपू सुलतान शूर होते, असे वक्तव्य केले होते. ते सोयीने विसरून भाजपा आता सपकाळ यांच्या विरोधात रान उठवत आहेत.
टिपू वक्तव्याप्रकरणी पुण्यात पर्वती पोलीस ठाण्यात सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. आज पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास दीड तास सुरू असलेल्या या आंदोलनात सपकाळ यांचे टिपू सुलतानच्या पेहरावातील फलक झळकावण्यात आले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले. त्यांच्या हातात एपस्टिन मोदी भाई-भाई असे फलक होते. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्हीकडील कार्यकर्त्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच अचानक दगडफेक झाली. यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसह पत्रकार जखमी झाले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही संतप्त झाले. त्यांनी या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की, भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाच्या दिशेने दगड व बाटल्या फेकल्या. यात काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले. यामध्ये महिला कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही वाहनांचेही नुकसान झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिला पोलिसासह काही पत्रकारही जखमी झाले. मात्र पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना पाठिंबा देऊन अभय दिले. आज हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, भाजपा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. त्यांना स्पष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज माझ्याकडून शिकण्याची गरज नाही. ते काँग्रेसची आन-बान-शान आहेत. पत्रकारांनी कार्यालयात शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे फोटो लावण्याबाबत भूमिका विचारल्यावर मी सांगितले की, शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वराज्याच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान इंग्रजांविरोधात लढले. त्या संदर्भातच दोघांचे फोटो लावण्याबाबत मी मत व्यक्त केले.
भाजपा माझ्या विधानाला हिंदू-मुस्लीम रंग देत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच निवडणुकांमध्ये टिपू सुलतानचे फोटो भाजपाच्या प्रचारात होते, मग आता विरोध का?मी फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली, त्यांना मी जल्लाद म्हटले, तेव्हा त्यांनी मला ओळख दाखवली नाही. ते मला ओळखत नाहीत, असे ते म्हणाले होते. परंतु आता अशा प्रकरची गरळ ओकून ते महाराष्ट्रातील मुलभूत मुद्दे, एपस्टिन फाईलमधील माहितीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक बाबतीत जात व धर्म आणणे हा भाजपाचा जुना फंडा आहे. पुण्यातील भाजपाचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले. त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. पुणे पोलिसांनी दंगेखोर भाजपा गुंडाना चिथावणी देणार्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपाच्या दंगेखोरांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. भाजपाने राज्यात अमरावती चंद्रपूरसह 21 ठिकाणी धर्मांध एमआयएमशी युती केली आहे, हे भाजपाला चालते, मग आताच काय झाले? भाजपा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा आणणार व 17 तारखेला माझे पुतळे जाळणार असल्याची माहिती आहे. मग सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याला कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे म्हटले, सावरकरांनी महाराजांबद्दल जे विकृत लिखाण केले, भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली त्याबद्दल भाजपा सावरकर व कोश्यारी यांचे पुतळे जाळणार का?
भाजपातर्फे आज मुंबईत दादर येथे सकपाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यवतमाळ शहरातही भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस आ. बाळासाहेब मांगुळकर यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढला. याशिवाय भाजपाचे मंत्री नितेश राणे, भाजपाचे मुंबई प्रमुख अमित साटम यांनीही सकपाळांवर सडकून टीका केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुघलांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा अपमान करणारा हर्षवर्धन सपकाळ हा दुसरा व्यक्ती आहे. ज्या शहरात जातील त्या ठिकाणी सपकाळ यांचा निषेधच होईल. त्यांनी या पदावर राहण्याचा अधिकार गमावला असून तातडीने राजीनामा दिला पाहिजे. अशी कृती करणारे लोक ‘मेंटल’ झाले आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. अशा मानसिकतेच्या लोकांना महाराष्ट्रात फिरण्याचा कोणताही अधिकार नाही.
—————————————————————————————————————————–










