Home / महाराष्ट्र / Parth Pawar : पार्थ पवारांची सुटका? दिग्विजय पाटलांना अटक?

Parth Pawar : पार्थ पवारांची सुटका? दिग्विजय पाटलांना अटक?

Parth Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सहभाग असलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया...

By: Team Navakal
Rajya Sabha Election 2026
Social + WhatsApp CTA

Parth Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सहभाग असलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार आणि पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज मागे घेतला. त्यामुळे दिग्विजय पाटील यांना कधीही पोलीस अटक करतील अशी शक्यता  आहे. या प्रकरणात दिग्विजय पाटील यांना दोषी ठरवून पार्थ पवार यांची सुटका करण्याची योजना असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे मामेभाऊ आहेत. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीमध्ये त्यांची केवळ एक टक्का भागीदारी आहे. तर पार्थ पवार यांचा या कंपनीत 99 टक्के हिस्सा आहे. मात्र व्यवहाराच्या कागदपत्रांवर दिग्विजय पाटील यांची सही असल्याने केवळ त्यांना पुढे केले जात आहे.


या जमीन गैरव्यवहारात जमीन विकणारी जमिनीची कुलमुखत्यारपत्रधारक शीतल तेजवानी हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात केवळ शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची नावे आहेत. तेजवानीच्या अटकेनंतर दिग्विजय पाटील यांना अटक होण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावर न्यायालयाने काही निर्णय देण्याआधीच पाटील यांनी हा अर्ज मागे घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.


मुंढवा येथील केंद्र सरकारच्या अखत्यारितील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मालकीची 40 एकराची 300 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन अमेडिया कंपनीने  नाममात्र किमतीत विकत घेतली. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यामध्ये हा व्यवहार झाला आहे. या व्यवहाराची दस्त नोंदणी करताना शासनाचे मुद्रांक शुल्क देखील कमी भरण्यात आले. या व्यवहारासंबंधी कागदपत्रांवर पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आरोपपत्रात पार्थ पवार यांचे नाव घेतले नाही. त्यावरून राज्यकीय वर्तुळात बराच गदारोळ सुरू आहे. या दरम्यान 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे काही दिवस या गैरव्यवहारावर फारशी चर्चा होत नव्हती. आता दिग्विजय पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रभागी आले आहे.


दरम्यान, दिग्विजय पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि या प्रकरणी तक्रार दाखल करणारे पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.  दिग्विजय पाटील हे अमेडिया कंपनीतील फक्त एक टक्का भागीदार आहेत. ते अवघ्या 22 वर्षांचे आहेत. तर पार्थ पवार हे कंपनीत 99 टक्के भागीदार आहेत. या प्रकरणात तेच खरे गुन्हेगार आहेत. त्यामुळे शिक्षा त्यांनाच व्हायला हवी. मात्र माझा आता संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वासच उडाला आहे. त्यामुळे दिग्विजय पाटील यांना अटक झाली तरी पार्थ पवारांपर्यंत हे प्रकरण जाईल, असे मला तरी वाटत नाही, असे दमानिया म्हणाल्या.


दमानिया यांच्यासारखाच सूर विजय कुंभार यांनी लावला. या प्रकरणात खरे गुन्हेगार पार्थ पवार आणि शीतल तेजवानी हेच आहेत. मात्र पोलिसांनी केवळ शीतल तेजवानीला अटक करून कारवाई केल्याचा आव आणला आहे. पार्थ पवार यांना हात लावण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही. पोलीस त्या दिशेने चौकशीच करत नाहीत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या खारगे समितीनेही काही कागदपत्रे तपासली. तर काही कागदपत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना अटक होईल असे वाटत नाही, असे कुंभार म्हणाले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या