₹1,150 Crore Land in Shinde MP Sandipan Bhumre’s Driver’s Name – शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेख याने 23 एकरची 1,150 कोटींची जमीन बनावट हिबानामा (बक्षीसपत्र) करून हडपल्याचा खळबळजनक आरोप उबाठा नेते अंबादास दानवे यांनी आज केला. धक्कादायक म्हणजे, या ड्रायव्हरचा जन्म 1985 सालचा आहे आणि त्याच्या जन्माआधीच म्हणजे 1971 साली ही जमीन त्याच्या नावे करण्याचा भ्रष्टाचार झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर
समृद्धी महामार्ग प्रकल्पात गेलेल्या या जमिनीचा कोट्यवधींचा मोबदला मिळवण्यासाठी अर्जही करण्यात आला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी उबाठाचे अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
विशेष म्हणजे, आठ महिन्यांपूर्वी असाच एक हिबानामा करून 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन लाटल्याचा आरोप जावेद शेखवर झाला होता. त्यावेळी चौकशीचे आदेश देऊनही पुढे काहीच बाहेर आले नव्हते. भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावाने कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या हिबानाम्याचा प्रकार दुसऱ्यांदा होतो, हा सगळाच प्रकार संशयास्पद आहे. आता या नव्या प्रकरणाची तरी चौकशी होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील जटवाडा जोगवाडा भागातील 23 एकर 9 गुंठे जमीन लता सूर्यभान वाघामारे यांचे खापर पणजोबा दिवंगत पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे होती. ते या जमिनीचे प्रतिबंधित मालक होते. हैदराबाद संस्थानात ती त्यांना बहाल करण्यात आली होती. 1957 मध्ये प्रमाणपत्राच्या आधारे बहाल केलेली जमीन त्यांच्या मृत्यूनंतर पडीक होती. ही जमीन पुढे महाराष्ट्र विकास मंडळास संपादीत करून देण्यात आली होती.
हिच जमीन हैदराबाद कुळ कायदा 1950 च्या कलम 38 च्या आधारे जारी केलेल्या सरकारी ऐलानद्वारे जावेद रसूल शेख यांना 1971 मध्ये हिबानामामार्फत बहाल करण्यात आली. विशेष म्हणजे, या जमिनीच्या हिबानामाबाबतच्या नोंदीसाठी विभागीय आयुक्तालयातील सहआयुक्त शुभांगी आंधळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 25 जुलै रोजी पत्र लिहिले होते. त्यानंतर सक्षम अधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या उत्तरातून ही माहिती उघड झाली.
अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, या जमिनीच्या संपादनाच्या मोबदल्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. मूळ मालक किंवा ताबेदाराने हिबानामा बनवून शेख याला दिली आहे. मात्र हिबानामा ज्यांनी बनवला, त्याची जन्मवर्ष 1985 आहे. त्याने 1971 हिबानामा कसा बनवला? शिवाय हिंदू व्यक्तीने मुस्लिमाच्या नावाने हिबानामा कसा केला? सहा महिन्यांपूर्वी भरपाईचा प्रस्ताव आला आहे. शेख हा खासदार संदिपान भुमरेंचा चालक आहे. त्यामुळे यामागचा बोलवता धनी कोण आहे? यात कोणाचे हितसंबंध दडले आहेत? जावेद रसूल शेख यांच्या पाठीशी कोण आहे? शासनाचे कोट्यवधी रुपये गैरमार्गाने खिशात घालण्याचा प्रकार होत आहे. याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.
आपल्यावरील हा आरोप खा. संदिपान भुमरे यांनी असे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया देत फेटाळून लावला. ते म्हणाले की, जावेद रसूल शेख हा आमचा ड्रायव्हर आहे. पण मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यानुसार असा हिबानामा झालेला नाही. त्याच्या नावावर 23 गुंठे जमीन नाही. ज्याच्या नावे हिबानामा झाला आहे, तो जावेद हा नाही. तो कोण हे अंबादास दानवेंनाच ठाऊक. त्यांना सगळीकडे संदिपान भुमरेच दिसतो. पूर्वीही त्यांनी असाच एक हिबानामा काढला होता. त्यांचा आरोप खरा असेल, तर त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा.
खा. भुमरेंचे पुत्र आमदार विलास भुमरे यावर म्हणाले की, दानवे यांचे पद आणि प्रोटोकॉल गेल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आमच्यावर लोकांचे राजकीय प्रेम असल्याने आमची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. हा आरोप अजिबात खरा नाही. आमचे नाव जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी तो करण्यात आला आहे. आम्ही जावेदकरवी त्यांच्यावर बदनामीचा खटला टाकू. आमच्या ड्रायव्हरचा कुठलाही संबंध नाही. दुसऱ्या कोणाचा संबंध असू शकतो. दानवे म्हणतात की, या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, पण आरोप खोटे असतील तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, तशी मागणी आम्हीच मुख्यमंत्र्याकडे करणार आहोत.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी जुलै महिन्यांपूर्वी जावेद रसूल शेख हा 150 कोटी रुपयांच्या तीन एकर जमिनीचा मालक असल्याचे आढळले होते. ही जमीनही हैदराबादच्या प्रसिद्ध सालारजंग घराण्याच्या वंशजांनी शेखच्या नावावर हिबानामा म्हणून दिल्याचे सांगितले होते. या हिबानाम्यावर मीर मझहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी सही केली होती. याप्रकरणी परभणी येथील वकिल मुजाहिद खान यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांना या तक्रारीत म्हटले होते की, हिबानामा ही कायदेशीररित्या वैध प्रक्रिया आहे. परंतु ती प्रामुख्याने रक्ताच्या नात्यातील व्यक्तींमध्येच होते.
मात्र या प्रकरणात जावेद आणि सालारजंग कुटुंबातील सदस्य यांच्यात कोणताही संबंध नाही. याशिवाय दोघेही वेगवेगळ्या इस्लामी पंथातील आहेत. या परिस्थितीत एवढी मौल्यवान जमीन जावेद शेखला भेट देणे संशयास्पद आहे. त्यावेळी जावेद रसूल शेखने म्हटले होते की, माझे सालारजंग कुटुंबाच्या वंशजांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी ही जमीन मला भेट म्हणून दिली आहे. या तुक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून यासंदर्भात तपास सुरू करण्यात आला होता.
जावेदसह सालारजंग कुटुंबाच्या वंशजांचीही चौकशी होणार होती. परंतु सालारजंग कुटुंबातील सदस्यांचे फोन सतत बंद असल्याने त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यानंतर ही चौकशी थंडावली. आता पुन्हा तसाच प्रकार घडल्यानंतर खा. भुमरे, ड्रायव्हर जावेद शेख आणि कोट्यवधींच्या जमिनींचे गौडबंगाल नेमके काय आहे, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाबरोबर सर्वसामान्यांनाही वाटत आहे.
हे देखील वाचा –
काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना जबरदस्त मारहाण, पोलिसांनी केली तुषार दामगुडेची रिव्हॉल्व्हर जप्त..
जपानी मुलीचा तो व्हिडिओ व्हायरल! राज ठाकरेंनी व्हिडिओ शेअर करत थेट मोहन भागवंतांवर साधला निशाणा..










