Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निवडीनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ‘नव्या पर्वाची सुरुवात’ झाल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेताना आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “तुम्ही कितीही नव्या पर्वाच्या गप्पा मारल्या तरी ‘अजितपर्व’ कधीच संपणार नाही, कारण दादांप्रती लोकांच्या मनात अढळ स्थान आणि प्रेम आहे,” अशा शब्दांत रोहित पवारांनी सत्ताधारी नेत्यांना ठणकावून सांगितले.
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यावरून त्यांनी सरकारमधील नेत्यांना धारेवर धरले. ते म्हणाले, “सत्तेतील काही नेते माझ्या प्रयत्नांना ‘इव्हेंट’ म्हणून हिणवत आहेत. जर तुम्हाला माझे काम इव्हेंट वाटत असेल, तर तुम्ही सत्तेत असूनही एका साध्या एफआयआरसाठी मदत का करत नाही? एफआयआर नोंदवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटायचे ते वाटू द्या, पण सत्तेचा गैरवापर करून तपासात अडथळे आणण्यापेक्षा न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या.”
रोहित पवारांनी यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. “अजितदादा जिवंत असताना हे नेते त्यांना नियंत्रित करू शकत नव्हते, मात्र आता सुनेत्रा काकींना आपण आपल्या तालावर नाचवू शकतो किंवा त्यांना नियंत्रित करू शकतो, असे या नेत्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा मोठा गैरसमज आहे. एक पुतण्या म्हणून माझी काकींना नम्र विनंती आहे की, त्यांनीही या लोकांपासून सावध राहावे,” असा सूचक इशारा रोहित पवारांनी दिला. दादांच्या मृत्यूबाबत जनतेच्या मनात अनेक शंका आहेत, त्यामुळे राजकीय भाष्य करण्यापेक्षा एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
याचवेळी शरद पवार साहेबांनी अपघातानंतर दिलेल्या विधानावरून सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. “अजितदादांच्या निधनानंतर राज्यात दंगल उसळू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या सामाजिक बांधिलकीतून साहेबांनी ते विधान केले होते. त्या वेळी साहेब इतके भावूक झाले होते की त्यांना कॅमेऱ्याकडे पाहणेही अशक्य होते, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यामुळे त्यांना काही गोष्टी लिहून द्याव्या लागल्या आणि त्यांनी त्या वाचल्या. अशा भावनिक प्रसंगाचे भांडवल करून तुम्ही आज राजकारण करत आहात, ही खेदाची बाब आहे,” अशा शब्दांत रोहित पवारांनी विरोधकांचा समाचार घेतला.










