Jai Pawar Shared Video: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना पूर्ण झाला असतानाच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित विमान कंपनीचे (VSR) मालक रोहित सिंह हे उड्डाण सुरू असताना मुख्य वैमानिकाच्या (Pilot) सीटवर झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विमान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“ही एका मुलाची आर्तहाक आहे”
आपल्या भावना व्यक्त करताना जय पवार यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, “माझ्या वडिलांना आपण गमावले आहे आणि ही वेदना आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. पण या व्हिडिओमध्ये दिसणारा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे. आकाशात हजारो फूट उंचीवर असताना वैमानिक असा बेजबाबदारपणे झोपू कसा शकतो? हे केवळ माझ्या वडिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नसून प्रत्येक प्रवाशाच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.”
रोहित सिंह यांना अटकेची मागणी
जय पवार यांनी केवळ व्हिडिओ शेअर करून न थांबता, नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (DGCA) ठाम मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की:
संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत ‘VSR’ कंपनीची सर्व विमाने तात्काळ जमिनीवर उतरवण्यात यावीत (Grounding of Planes).रोहित सिंह यांना या निष्काळजीपणाबद्दल त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत.
प्राथमिक अहवाल आणि व्हिडिओचा संबंध
योगायोगाने, त्याच वेळी विमान अपघात चौकशी प्राधिकरणाचा (AAIB) 22 पानांचा प्राथमिक अहवालही समोर आला आहे. या अहवालात लँडिंगवेळी दृश्यमानता कमी असणे आणि विमानतळावरील तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. मात्र, जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे आता या अपघातामागे केवळ तांत्रिक कारणे नसून मानवी निष्काळजीपणाचा मोठा भाग असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा करताना दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. जय पवारांच्या या ताज्या आरोपांमुळे आता तपास यंत्रणांवर रोहित सिंह आणि संबंधित कंपनीवर कारवाई करण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे.










