Home / महाराष्ट्र / Rajya Sabha Election 2026 : शरद पवारांच्या उमेदवारीसाठी भाजप पडद्यामागून आग्रही? महाविकास आघाडीत बिघाडी घडवण्याची ‘चाणक्य’ नीती

Rajya Sabha Election 2026 : शरद पवारांच्या उमेदवारीसाठी भाजप पडद्यामागून आग्रही? महाविकास आघाडीत बिघाडी घडवण्याची ‘चाणक्य’ नीती

Rajya Sabha Election 2026 : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक आयोगाने बिगुल वाजवले असून, महाराष्ट्रातील ७ जागांवर होणाऱ्या...

By: Team Navakal
Rajya Sabha Election 2026
Social + WhatsApp CTA

Rajya Sabha Election 2026 : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक आयोगाने बिगुल वाजवले असून, महाराष्ट्रातील ७ जागांवर होणाऱ्या या निवडीने राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या, ५ मार्च ही अंतिम मुदत असतानाही महाविकास आघाडीमध्ये (मविआ) एका जागेवरून अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. विशेषतः शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम असल्याने, या संधीचा फायदा घेत भारतीय जनता पक्ष आपला पाचवा उमेदवार रिंगणात उतरवून महाविकास आघाडीची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीतील अंतर्गत रस्सीखेच-
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांपैकी विरोधी पक्षांच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी दावा ठोकला आहे. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांमध्येही या एका जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. शरद पवार यांना उमेदवारी देण्याबाबत आघाडीत अद्याप एकमत झालेले नाही. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जर शरद पवार मविआचे अधिकृत उमेदवार नसतील, तर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.

भाजपचा नवा राजकीय डाव-
महाविकास आघाडीतील या विसंवादाचा लाभ घेण्यासाठी सत्ताधारी महायुतीने विशेष रणनीती आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात नसतील, तर भाजप आपले चार अधिकृत उमेदवार निवडून आणल्यानंतर पाचवा अतिरिक्त उमेदवारही उतरवू शकते. अशा परिस्थितीत, महायुतीकडे भाजपचे पाच, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा प्रत्येकी एक, असे एकूण सात उमेदवार रिंगणात असू शकतात. यामुळे महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर निवडून येणाऱ्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

निवडणुकीचे सांख्यिकीय गणित-
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, १६ मार्च रोजी या ३७ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. सध्या रिक्त असलेल्या जागांपैकी १२ जागांवर ‘एनडीए’चे वर्चस्व आहे, तर २५ जागांवर विरोधी पक्षांचे सदस्य आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ७ जागांसाठी ही निवडणूक होत असून, तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५) आणि बिहार (५) या राज्यांचाही यात समावेश आहे. उद्या ५ मार्च रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने, आज सायंकाळपर्यंत उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा होणे अनिवार्य आहे.

अधिकच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्ष पडद्यामागून आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वरवर पाहता हा विरोधकांचा विषय वाटत असला, तरी शरद पवारांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत (मविआ) फूट पडू शकते, असा भाजपचा रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीत अंतर्गत नाराजीची भीती-
भाजपच्या या भूमिकेमागे अनेक राजकीय गणिते दडलेली आहेत. जर शरद पवारांना उमेदवारी दिली गेली, तर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांमध्ये, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटामध्ये नाराजी उफाळून येऊ शकते. विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे संख्याबळ अधिक असूनही त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात भाजपला यश येईल, अशी ही खेळी मानली जात आहे. यामुळे आघाडीतील पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊन ‘मविआ’मध्ये मोठी बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या ‘विरोधी पक्षनेते’ पदाला बसणार फटका?
या रणनीतीचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे काँग्रेसची कोंडी करणे. राज्यसभेत काँग्रेसला आपले संख्याबळ टिकवून ठेवणे आणि ‘विरोधी पक्षनेते’ पद पदरात पाडून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, जर ही एकमेव जागा शरद पवारांच्या वाट्याला गेली, तर काँग्रेसला एका जागेवर पाणी सोडावे लागेल. याचा थेट परिणाम राज्यसभेतील काँग्रेसच्या ताकदीवर होईल, जे भाजपसाठी राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा संभ्रम आणि महायुतीचा फायदा-
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या (अजित पवार आणि शरद पवार गट) विलीनीकरणाबाबत राजकीय चर्चा सुरू आहेत. अशा संवेदनशील काळात शरद पवारांना उमेदवारी दिल्यास विलीनीकरणाबाबतचा संभ्रम अधिक गडद होऊ शकतो. हा संभ्रम कायम राहणे महायुतीसाठी निवडणुकीच्या काळात पथ्यावर पडणारे आहे. मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणाऱ्या या गोंधळाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला घेता येईल, असा भाजपचा होरा आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या