Iran Israel Conflict Affect In India : पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील भीषण संघर्षाचा आज सातवा दिवस उजाडला असून, या युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धात आतापर्यंत इराणमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली असून, मृतांचा आकडा १४०० च्या पार गेला आहे. इराण हा जगातील कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा प्रमुख उत्पादक देश असल्याने, या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. या संघर्षाच्या झळा आता सात समुद्र पार करून थेट भारतापर्यंत, विशेषतः महाराष्ट्रातील पुणे शहरापर्यंत पोहोचल्या आहेत.
पुण्यात व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध-
युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणून पुण्यातील व्यावसायिक वापराच्या (Commercial) गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू नये आणि स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी तेल कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे. पुण्यातील शिक्रापूर येथील ‘भारत पेट्रोलियम’ (BPCL) आणि चाकणमधील ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’ (HPCL) या दोन्ही प्रमुख प्लांटमधून व्यावसायिक वापराचे सिलेंडर वितरीत करणे बंद करण्यात आले आहे. संबंधित डीलर्सना त्यांच्या गाड्या प्लांटवर न पाठवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
तेल कंपन्यांचा अधिकृत संदेश-
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी आपल्या अधिकृत वितरकांना (Dealers) विशेष संदेश पाठवला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “सध्याच्या युद्धजन्य आणि अनिश्चित परिस्थितीमुळे व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा तूर्तास थांबवण्यात येत आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया सिलेंडर भरण्यासाठी वाहने पाठवू नका. आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती सुधारल्यानंतर पुरवठा पूर्ववत करण्याबाबत कळवण्यात येईल.” या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिक, केटरिंग सेवा, धाबे, आणि रेस्टॉरंट्स संकटात सापडले आहेत. तसेच, बेकरी, मिठाईची दुकाने, रुग्णालये आणि ज्या कारखान्यांमध्ये (वस्त्रोद्योग, धातू उद्योग) गॅसचा वापर होतो, अशा उद्योगांच्या उत्पादनावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
युद्धाची ठिणगी आणि अण्वस्त्रांचा पेच-
या संघर्षाच्या मुळाशी इराणचा महत्त्वाकांक्षी अण्वस्त्र कार्यक्रम असल्याचे सांगितले जात आहे. २०२५ च्या सुरुवातीपासूनच इस्रायलने इराणला त्यांच्या अण्वस्त्र विस्तार आणि क्षेपणास्त्र क्षमतेबाबत वारंवार इशारे दिले होते. मात्र, इराणने या आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून आपली प्रक्रिया सुरूच ठेवली. वारंवार समज देऊनही इराण माघार घेत नसल्याचे पाहून, अखेर इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर थेट हवाई हल्ले चढवले. या हल्ल्यांमुळे इराण समर्थित गटांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, मध्य पूर्वेतील हा तणाव आता जागतिक आर्थिक संकटाचे रूप घेताना दिसत आहे. भारतासाठी हा पेच अत्यंत कठीण असून, इंधनाच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.












