Home / महाराष्ट्र / LPG Cylinder Price Hike: घरगुती गॅसची दरवाढ! बुकिंग 21 दिवसांनीच! तुटवड्याचेही गंभीर संकट ! गॅस कंपन्यांनी डिलरांकडे लाखो रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट मागितले

LPG Cylinder Price Hike: घरगुती गॅसची दरवाढ! बुकिंग 21 दिवसांनीच! तुटवड्याचेही गंभीर संकट ! गॅस कंपन्यांनी डिलरांकडे लाखो रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट मागितले

LPG Cylinder Price Hike: : इराण विरोधात अमेरिका व इस्रायलने छेडलेल्या युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी इंधन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली...

By: Team Navakal
lpg cylinder price hike
Social + WhatsApp CTA

LPG Cylinder Price Hike: : इराण विरोधात अमेरिका व इस्रायलने छेडलेल्या युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी इंधन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे हे युद्ध सुरू होऊन आठ दिवस होत नाहीत तोच भारतात तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी घरगुती गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅसची आणीबाणी लागू केली आहे. गॅस सिलिंडरची किंमतही 60 रुपयांनी वाढवली आहे. ग्राहकांना आता नव्या गॅस सिलिंडर बुकिंगसाठी किमान 21 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. गॅस पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी त्यांच्या डिलर्सकडून लाखो रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट मागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.


मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवर होऊ लागला आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ केली आहे. नव्या दरानुसार 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत 853 रुपयांवरून 913 रुपये झाली आहे. आजपासूनच हे नवे दर लागू झाले आहेत.  मुंबईत घरगुती सिलिंडरचा दर 852.50 रुपयांवरून 912.50 रुपये झाला आहे. कोलकात्यात तो 879 रुपयांवरून 939 रुपये झाला असून, चेन्नईमध्ये 868.50 रुपयांवरून 928.50 रुपये झाला आहे. घरगुती गॅसबरोबरच 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर 1,883 रुपये झाला आहे, तर मुंबईत तो 1,835 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात हा दर 1,990 रुपये आणि चेन्नईमध्ये 2,043.50 रुपये झाला आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या खाद्य व्यावसायिकांवरही मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.


घरगुती गॅस बुकिंगच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी दोन बुकिंगमध्ये किमान 15 दिवसांचे अंतर आवश्यक होते. आता हा कालावधी वाढवून 21 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना 21 दिवसांपूर्वी दुसरे बुकिंग करता येणार नाही.
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढून प्रति बॅरल सुमारे 90 डॉलरपर्यंत पोहोचल्या आहेत.  त्याचा परिणाम ऊर्जा बाजारावर झाला असून, गॅस आणि इंधन पुरवठ्यावरही दबाव निर्माण झाला आहे. कतारमधून भारताला होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा सुमारे 40 टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक वस्तू अधिनियम म्हणजेच सेस्मा लागू केला आहे. सरकारने घरगुती गॅसला प्राधान्य देत व्यावसायिक व औद्योगिक गॅसचा पुरवठा काही ठिकाणी मर्यादित केला आहे. रिफायनरी कंपन्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर स्वयंपाकाचा गॅस तयार करण्यासाठी करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.  सर्व तेल शुद्धीकरण कंपन्यांनी एलपीजी उत्पादन वाढवावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतात सध्या सुमारे 33 कोटींहून अधिक एलपीजी ग्राहक असून, त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय गॅस पुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. गॅस तुटवड्याचे काही परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसू लागले आहेत. नागपूरमधील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये सध्या केवळ तीन ते चार गॅस सिलिंडर शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. या कॅन्टीनमध्ये सामान्यतः 20 ते 25 सिलिंडरचा साठा असतो. मात्र सध्या बहुतांश सिलिंडर रिकामे झाले असून, उरलेले सिलिंडर फक्त एक ते दोन दिवस पुरतील, असे कॅन्टीन व्यवस्थापनाने सांगितले. या कॅन्टीनमध्ये दररोज सुमारे 100 लोक जेवण व नाश्त्यासाठी येतात. त्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास अडचणी वाढू शकतात.


युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल डिलर्सकडूनही आगाऊ पैसे मागण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी पेट्रोल पंप डिलर्सना काही दिवसांचे क्रेडिट दिले जात होते. मात्र सध्याच्या अनिश्चित परिस्थितीमुळे कंपन्यांनी क्रेडिट मर्यादा शून्यावर आणून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करण्यापूर्वी आगाऊ पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत. एका डिलरने सांगितले की, कंपनीकडून पाठवलेल्या सर्क्युलरमध्ये सर्व डिलर्सची क्रेडिट लिमिट शून्यावर आणण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता पेट्रोल किंवा डिझेलचा टँकर मिळवण्यासाठी आधी अ‍ॅडव्हान्स पेमेंट करावे लागणार आहे. जर  एखाद्या पंपावर 4 हजार लिटरची विक्री असेल तर  त्याला लाखो रुपयांचे आगाऊ पैसे भरावे लागतात. काही ठिकाणी 40 हजार लिटरपर्यंत विक्री होत असल्याने 40 ते 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम आधी भरावी लागणार आहे. नाशिक आणि पुण्यासारख्या शहरांमध्येही पेट्रोल पंप चालकांना अशाच सूचना देण्यात आल्या आहेत. या डिलरचे म्हणणे आहे की, इतकी रक्कम आगाऊ भरणे कठीण आहे. त्यात कारखान्यांकडे इंधन आलेच नाही तर ते आम्हाला कुठून देणार आहेत? या सर्वाचा पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर निश्चित परिणाम होणार आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपन्या सावध भूमिका घेत असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानात पेट्रोल
डिझेल दरात मोठी वाढ

पाकिस्तान सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रति लीटर 55 पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढ झाल्यानंतर पेट्रोलचा दर 335.86 रुपये, तर डिझेल 321.17 रुपये प्रति लीटर झाला आहे. पाकिस्तान आपल्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे 35 टक्के गरज इराणमधून अवैध मार्गाने येणार्‍या तेलावर भागवतो. बलुचिस्तानमध्ये   सुमारे 80 टक्के पेट्रोल-डिझेलची गरज इराणी तेलावर अवलंबून आहे. तसेच सिंधमध्ये सुमारे 20 टक्के, खैबर पख्तूनख्वामध्ये 18 टक्के आणि पंजाबमध्ये सुमारे 13 टक्के तेलाची गरज इराणमधून पूर्ण होते. पाकिस्तानकडे सध्या सुमारे 24 दिवसांचा पेट्रोल-डिझेल साठा असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र इराणमधून येणारा पुरवठा खंडित झाल्याने बलुचिस्तानमध्ये परिस्थिती गंभीर झाली असून, तेथील 70 टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंप रिकामे असल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवार गट आक्रमक
ठाण्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात शरद पवार गट आज आक्रमक झाला होता. शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल पेटवून आंदोलन करत गॅस दरवाढीचा निषेध केला. त्याचबरोबर  ‘महिला दिनाची अनोखी भेट, गॅस सिलिंडर जातोय हजारावर थेट’ अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या