Home / महाराष्ट्र / Abhijeet Dipke CJP : दिल्लीत आंदोलन फ्लॉप झाल्यानंतर ‘कॉकरोच पार्टी’चा पुण्यात एल्गार; सोनम वांगचुक आणि असीम सरोदे यांच्या पाठिंब्याने आज पुण्यात आंदोलन!

Abhijeet Dipke CJP : दिल्लीत आंदोलन फ्लॉप झाल्यानंतर ‘कॉकरोच पार्टी’चा पुण्यात एल्गार; सोनम वांगचुक आणि असीम सरोदे यांच्या पाठिंब्याने आज पुण्यात आंदोलन!

Abhijeet Dipke CJP : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली....

By: Team Navakal
Abhijeet Dipke CJP
Social + WhatsApp CTA

Abhijeet Dipke CJP : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. या गंभीर गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) कमालीची आक्रमक झाली आहे. नीट परीक्षेतील कमालीचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेला खेळ या मुद्द्यांवरून या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर, ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली जाहीर आंदोलन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनाला अपेक्षेप्रमाणे हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आज, ११ जून रोजी या संघटनेच्या वतीने पुणे शहरात आंदोलन छेडण्यात येणार आहे.

पुण्यात अभिजित दीपके यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला. दीपके म्हणाले की, आगामी २० जून रोजी दिल्लीत मोठे आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येणार आहे. देशभरातील सर्व विद्यार्थ्यांनी २० जूनला दिल्लीत एकत्र यावे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही तिथून मागे हटणार नाही.”

दरम्यान, अभिजित दीपके यांच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिकेवर आणि विधानांवर आता चौफेर टीका होऊ लागली आहे. यापूर्वी जेव्हा दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन झाले होते, तेव्हा दीपके यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, ‘पुढील शनिवारी’ म्हणजेच या चालू आठवड्यातील शनिवारी पुढील आंदोलन केले जाईल. परंतु, आता अवघ्या काही दिवसांतच त्यांनी आपली भूमिका बदलत थेट ‘२० जून’ ही नवी तारीख जाहीर केली आहे. त्यांच्या या धरसोड वृत्तीमुळे आणि दुटप्पी भूमिकेमुळे त्यांच्यावर सडकून टीका केली जात असून, आंदोलनाच्या नियोजनाबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजित दीपके यांनी सांगितले की, आज संध्याकाळी पुण्यात अत्यंत शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने हे आंदोलन पार पडणार आहे. या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक हे देखील या आंदोलनात प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. या आंदोलनादरम्यान संघटनेच्या वतीने देशातील शिक्षण व्यवस्थेबाबत एक महत्त्वपूर्ण ‘जाहीरनामा’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने आणि माझे हक्काचे क्षेत्र (होम ग्राउंड) असल्याने, आजचे हे आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनापेक्षाही अधिक भव्य आणि प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्याच्या आंदोलनानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आपण नागपूरकडे कूच करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी सरकारकडून होणाऱ्या अन्यायावर तीव्र बोट ठेवले. ते म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सरकारशी चर्चा करण्यास सदैव तयार आहोत. परंतु, संवाद साधण्याऐवजी सरकारकडून आमची समाजमाध्यमांवरील खाती (Accounts) बंद केली जात आहेत; ही लोकशाहीत कोणती पद्धत आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही केवळ एक संघटना नसून देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी दिलेला एक मोठा संदेश आहे, त्यामुळे या चळवळीला कोणीही ‘फेक’ (बनावट) ठरवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून, केवळ आणि केवळ देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेला हा लढा आहे. आगामी काळात ही संघटना शेतकऱ्यांच्या आंदोलनातही सक्रिय सहभाग नोंदवणार आहे, मात्र सध्यातरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या