Ulhasnagar Murder News : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात आज मानवतेला काळिमा फासणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची भरदिवसा, कर्तव्यावर असताना धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. महादू जगताप असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, ते पालिकेने साफसफाईचा ठेका दिलेल्या ‘कोणार्क’ कंपनीमार्फत कार्यरत होते. या हत्येच्या बातमीने शहर सुन्न झाले असतानाच, पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या पत्नी पूर्वी महादू जगताप यांनीही आत्महत्या केल्याची विदारक माहिती समोर आली आहे. या दुहेरी आघातामुळे संपूर्ण उल्हासनगर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
भररस्त्यात थरार आणि सीसीटीव्ही फुटेज
मिळालेल्या माहितीनुसार, महादू जगताप हे उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील सेक्शन २० परिसरात असलेल्या आनंद आईस्क्रीम दुकानाजवळ नेहमीप्रमाणे स्वच्छतेचे काम करत होते. सकाळी कामात व्यस्त असतानाच एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, हल्लेखोर रक्ताने माखलेल्या शस्त्रासह पळून जाताना दिसत आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणि कर्मचाऱ्यांचा संताप
सार्वजनिक ठिकाणी आणि ड्युटीवर असताना एका सफाई कामगाराचा असा अंत झाल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीसह तीव्र संतापाचे वातावरण आहे. “आम्ही शहराच्या स्वच्छतेसाठी रात्रंदिवस राबतो, पण आम्हाला साधे संरक्षणही नाही का?” असा आर्त सवाल कर्मचारी विचारत आहेत. या घटनेमुळे सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.









