Baramati By-Polls: केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. मात्र, ही निवडणूक ज्या दुःखद पार्श्वभूमीवर होत आहे, त्याबद्दल आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेली भावना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर आता २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, या घोषणेने रोहित पवार कमालीचे भावूक झाले आहेत.
स्वप्नातही न वाटलेली राजकीय परिस्थिती
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये बारामतीच्या बदललेल्या स्थितीवर भाष्य करताना म्हटले की, ज्या बारामती मतदारसंघात वर्षानुवर्षे फक्त ‘मताधिक्याची’ चर्चा व्हायची, तिथे कधी अशी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा गड नेहमीच अभेद्य राहिला आहे. मात्र, आज त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून तिथे निवडणूक जाहीर होणे, हे बारामतीकरांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अपघाताबाबत पुन्हा व्यक्त केला संशय
केवळ निवडणुकीची घोषणाच नाही, तर अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबतही रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ही घटना केवळ एक अपघात नसून घातपाताचा संशय असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
व्हीएसआर कंपनी आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) कामकाजावर त्यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, विमान उड्डाणापूर्वी आवश्यक ती सुरक्षा मानके पाळली गेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ही आपली मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे.
दुसरीकडे, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आमची इच्छा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेली ही जागा एक भावनिक विषय आहे. त्यामुळे महायुतीचा प्रयत्न ही निवडणूक बिनविरोध करण्याचा असेल. मात्र, जर ही निवडणूक लादली गेली आणि समोरून उमेदवार दिला गेला, तर आम्ही देखील पूर्ण ताकदीने निवडणूक लढायला सज्ज आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.










