Iran Israel War : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आज १७ व्या दिवशी अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या या युद्धाची दाहकता प्रतिदिवस वाढत असून, आता या संघर्षात इराणने आपले सर्वात विध्वंसक अस्त्र रणांगणात उतरवले आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी तळांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात असून, यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत चिघळली आहे.
‘सेजिल’ क्षेपणास्त्राचा प्रथमच वापर-
या युद्धातील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी म्हणजे, इराणने आपल्या भात्यातील सर्वात घातक शस्त्र मानल्या जाणाऱ्या ‘सेजिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा’ (Sejjil Ballistic Missile) प्रथमच प्रत्यक्ष युद्धात वापर केला आहे. या क्षेपणास्त्राने इस्रायलच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लष्करी तळांना लक्ष्य केले असून, यामुळे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ‘सेजिल’ हे क्षेपणास्त्र त्याच्या प्रचंड वेग आणि अचूकतेसाठी ओळखले जाते, ज्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता अधिक भडकण्याची चिन्हे आहेत.
अमेरिका आणि इस्रायलच्या तळांवर हल्ल्यांचे सत्र-
इराणने केवळ इस्रायललाच नव्हे, तर या युद्धातील प्रमुख पक्ष असलेल्या अमेरिकेलाही गंभीर इशारा दिला आहे. इराण पुरस्कृत सशस्त्र गटांकडून विविध ठिकाणी असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर सातत्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले जात आहेत. इस्रायलच्या अनेक मोक्याच्या ठिकाणांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्यामुळे इस्रायली सैन्य काही अंशी हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण रणनीतीला मोठा धक्का बसला आहे.
मध्यपूर्वेतील शांतता धोक्यात-
गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षाने आता जागतिक चिंतेचे रूप धारण केले आहे. एका बाजूला अमेरिका आणि इस्रायलची प्रगत शस्त्रसामग्री आणि दुसऱ्या बाजूला इराणची घातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यामुळे हा प्रदेश पूर्णतः युद्धभूमी झाला आहे.
इराणचा ‘आवाजापेक्षा वेगवान’ प्रहार: ‘सेजिल’ क्षेपणास्त्राचा थरार आणि जागतिक तेल पुरवठ्यावर संकटाचे सावट-
मध्यपूर्वेतील युद्ध आता एका अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथून जागतिक संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) त्यांच्या ताफ्यातील सर्वात संहारक अस्त्र असलेल्या ‘सेजिल’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ताकद जगाला दाखवून दिली आहे. हे क्षेपणास्त्र केवळ इस्रायलसाठीच नव्हे, तर दूरवरच्या अनेक देशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
‘सेजिल’ची तांत्रिक विद्ध्वंसकता: आवाजापेक्षा १३ पट वेग-
इराणच्या लष्करी तज्ज्ञांनुसार, ‘सेजिल’ हे क्षेपणास्त्र घन इंधनावर (Solid Fuel) चालणारे असून तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत आहे. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा तब्बल १३ पटीने जास्त (मॅक १३) आहे, ज्यामुळे शत्रूच्या रडार यंत्रणेला याला रोखणे जवळपास अशक्य होते. २००० ते २५०० किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकते. इतकेच नव्हे तर, याचा पल्ला भारत, युक्रेन आणि रशियाच्या काही भागांपर्यंत विस्तारलेला आहे. पवित्र कुराणातील ‘जळणारा दगड’ या संदर्भावरून याला ‘सेजिल’ असे सार्थ नाव देण्यात आले आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे अशा क्षेपणास्त्रांचा मोठा साठा सुरक्षित असून, गरजेनुसार त्यांचा वापर टप्प्याटप्प्याने केला जाईल.
इराणचा आक्रमक पवित्रा: चर्चेचे दरवाजे बंद-
मुत्सद्देगिरीच्या पातळीवर इराणने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जगाला ठणकावून सांगितले आहे की, इराणने कोणत्याही प्रकारच्या युद्धविरामाची मागणी केलेली नाही किंवा अमेरिकेशी चर्चेचा कोणताही प्रस्ताव मांडलेला नाही. “जोपर्यंत आमचे सार्वभौमत्व धोक्यात आहे, तोपर्यंत आम्ही स्वसंरक्षणासाठी लढत राहू. जोपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध बेकायदेशीर असल्याचे मान्य करत नाहीत, तोपर्यंत इराण एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामुळे नजीकच्या काळात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता मावळली आहे.
‘होर्मुझची सामुद्रधुनी’ आणि जागतिक तेल संकट-
जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’बाबत (Strait of Hormuz) इराणने घेतलेला निर्णय सर्वात चिंताजनक आहे. इराणने हा जलमार्ग पूर्णपणे बंद केला नसला तरी, तिथे ‘स्मार्ट कंट्रोल’ (Smart Control) लागू केल्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की, हा मार्ग केवळ अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांसाठी प्रतिबंधित असेल, तर इतर देशांसाठी तो खुला राहील. मात्र, या निर्णयामुळे जागतिक तेल पुरवठ्यात मोठी विस्कळीतपणा येण्याची भीती आहे.











