Home / News / Iran Israel war ‘Shivalik’ & ‘Nanda Devi’Arrives : शिवालिक’नंतर ‘नंदा देवी’ दाखल! 92,000 टन गॅस आला 64 लाख सिलिंडर भरणार! देशाची एका दिवसाची गरज भागणार

Iran Israel war ‘Shivalik’ & ‘Nanda Devi’Arrives : शिवालिक’नंतर ‘नंदा देवी’ दाखल! 92,000 टन गॅस आला 64 लाख सिलिंडर भरणार! देशाची एका दिवसाची गरज भागणार

iran israel war – ‘Shivalik’ & ‘Nanda Devi’Arrives- मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) घेऊन काल शिवालिक हे पहिले...

By: Team Navakal
Shivalik’ & ‘Nanda Devi’Arrives-
Social + WhatsApp CTA

iran israel war‘Shivalik’ & ‘Nanda Devi’Arrives- मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) घेऊन काल शिवालिक हे पहिले भारतीय जहाज होर्मुज सामुद्रधुनी पार करून गुजरातमध्ये सुखरुप पोहोचले. काल रात्रीच उशिराने नंदा देवी नावाचे दुसरे जहाजही गुजरातच्या वाडिनार बंदरात दाखल झाले.

या दोन्ही जहाजांमधून प्रत्येकी 46 हजार मेट्रिक टन असा एकूण 92,000 मेट्रिक टन इतका एलपीजी भारतात आला आहे. या गॅसमुळे 64 लाखांहून अधिक सिलिंडर भरले जाणार आहेत. मात्र, हा साठा फक्त एका दिवसांची मागणी पूर्ण करणारा असल्याने मध्य पूर्वेतून गॅस वाहतूक सुरळीत झाल्याशिवाय गॅसटंचाईच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार नाही.


इराणने शत्रू राष्ट्रांच्या तेलवाहू जहाजांसाठी होर्मुज जलमार्ग बंद केला आहे. मात्र, भारत हा इराणचा मित्रदेश असल्यामुळे भारतीय तेलवाहू जहाजांना होर्मुजचा मार्ग काही प्रमाणात खुला झाला आहे. या निर्णयानंतर शिवालिक आणि नंदा देवी ही दोन जहाजे कतार येथून एलपीजी घेऊन भारतात दाखल झाली आहेत.

या दोन्ही जहाजांत प्रत्येकी 46,000 मेट्रिक टन एलपीजी आहे. एक मेट्रिक टन म्हणजे 1,000 किलोग्रॅम या हिशेबाने या दोन जहाजांतून 4,60,00,000 किलोग्रॅम इतका एलपीजी भारतात आला आहे. भारतात घरगुती गॅस सिलिंडर 14.2 किलोग्रॅमचा असतो. त्यामुळे एका जहाजातून आलेल्या एलपीजीमुळे एकूण 32 लाख 39 हजार इतके सिलिंडर भरले जाणार. तर दोन जहाजांतून आलेल्या एलपीजीमुळे एकूण 64.78 लाखांहून अधिक सिलिंडर उपलब्ध होतील.

सध्या घरगुती गॅसला प्राथमिकता देण्याचे सरकारचे धोरण असल्याने हा सगळा गॅस घरगुती सिलिंडर भरण्यासाठीच वापरला जाणार आहे. मात्र, पेट्रोल आणि गॅस मंत्रालयाच्या सह सचिव सुजाता शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, दोन जहाजांतून आलेला साठा देशाच्या एलपीजीची केवळ एक दिवसाची मागणी पुरवेल इतका आहे. सध्या देशात दररोज 60 ते 70 लाखांपर्यंत गॅस सिलिंडरचे बुकिंग होत आहे.

13 मार्च रोजी ते सर्वाधिक 89 लाखांवर गेले होते. परंतु आता ते कमी होत आहे. या तुलनेत दररोज 50 लाख सिलिंडरचा पुरवठा होत आहे. तर सिलिंडर रिफ्युलिंग 60 लाखांच्या आसपास आहे. 13 मार्चला सर्वाधिक 62,52,000 सिलिंडर रिफ्युल करण्यात आले. भारतीय रिफायनरीमधून एलपीजी उत्पादन 38 टक्क्यांनी वाढले आहे, तर सध्या ऑनलाईन बुकिंगचे प्रमाण 94 टक्के आहे. त्यामुळे देशात गॅसची टंचाई नाही. नंदादेवी जहाजातून आलेल्या एलपीजीपैकी सुमारे 24 हजार मेट्रिक टन एलपीजी तामिळनाडूला पाठविण्यात येणार आहे.


भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा एलपीजीचा ग्राहक आहे. मागील 10 वर्षांत देशात एलपीजीचा वापर 60 टक्क्यांनी वाढला आहे. 2015-16 मध्ये दररोज 19.6 मिलियन मेट्रिक टन इतका एलपीजी लागत होता. आता तो 31.3 मिलियन मेट्रिक टन गरज लागते. भारतात घरगुती एलपीजीचे 33 कोटी ग्राहक आहेत. आता हीच संख्या 16.6 कोटी झाली आहे. याचा अर्थ घरगुती गॅस ग्राहकांची संख्या दुप्पट झाली आहे.


दरम्यान, देशात गॅसटंचाई असताना सरकार विदेशात गॅस निर्यात करत आहे, या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ओंकार सेल्स आणि इतर गॅस वितरकांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्यायालयाने फेटाळली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्या. अनिल एस किलोर आणि राज डी वाकोडे यांच्या खंडपीठाला सांगितले की, इराण-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तुटवड्याचा भारतातील पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. वाटाघाटी सुरू आहेत.


सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलण्यात येत असलेल्या पावलांचा तपशील हेतुपुरस्सर दिला जात नाही. त्यामुळे, इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या काळात देशांतर्गत पुरवठ्यापेक्षा निर्यातीला प्राधान्य दिले जात असल्याचा दावा करणार्‍या एलपीजी डीलरनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात यावी. त्यानंतर न्यायालयाने व्यापक हिताच्या मुद्यावर याचिका फेटाळली.

इराणचे संरक्षण प्रमुख
लारिजानी मारले गेले
इस्रायलचा दावा


मध्य पूर्वेतील युध्दात इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी मारले गेले आहेत, असा दावा इस्रायलने केला आहे.लारिजानी यांना इराणचे युध्द धोरण ठरवणारे प्रमुख सुत्रधार मानले जाते. त्यांचा मृत्यू इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आधीच या युध्दात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी मारले गेले आहेत. तर त्यांचे उत्तराधिकारी मोज्ताबा खामेनी गंभीर जखमी झाल्याने कोमामध्ये गेल्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्य एक कमांडर गुलामरेजा सुलेमानी सोमवारी रात्री हवाई हल्ल्यात मारले गेले आहेत.


मोज्ताबा यांचे नेमके काय झाले आहे, याची अधिकृत माहिती अद्याप इराणच्या वतीने देण्यात आलेली नाही. त्यातच युध्दाच्या परिस्थितीत देशातील क्रमांक दोनची व्यक्ती मानले जाणारे लारिजानी मारले गेल्याचे वृत्त आल्याने इराणमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.लारिजानी हे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव होते. लारिजानी यांनी दोन दिवसांपूर्वी असा इशारा दिला होता की, लैंगिक गुन्ह्याचा आरोपी जेफ्री एपस्टीन याच्या नेटवर्कमधील सामिल असलेली मंडळी इराणवर 9/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखत आहेत.

लारिजानी यांनी अणु कार्यक्रमासंबंधी अमेरिकेशी सुरू असलेल्या वाटाघाटींचे नेतृत्व केले होते. ते आयातुल्ला अली खामेनी यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. 13 मार्च रोजी एका जाहीर सभेत ते राष्ट्राध्यक्ष मसुद पेजेश्कियान यांच्यासोबत शेवटचे दिसले होते. त्याच दिवशी अमेरिकेने लारिजानींसह महत्त्वाच्या इराणी नेत्यांची माहिती देणार्‍याला 10 दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. अली खामेनी यांच्यानंतर मारले गेलेले लारिजानी हे दुसर्‍या क्रमांकाचे इराणचे सर्वोच्च नेते ठरले आहेत.


Web Title:
संबंधित बातम्या