Ashok Kharat : स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या आणि अंकशास्त्राच्या (Numerology) बुरख्याखाली उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या अशोककुमार एकनाथ खरात याच्या पाशवी कृत्यांनी नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आध्यात्मिक विधी आणि भविष्यातील संकटांचे भय दाखवून एका २८ वर्षीय पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली आहे. त्याला नुकतेच जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असून, या प्रकरणातील धक्कादायक तपशील आता समोर येत आहेत.
विश्वासाचा घात आणि ‘दैवी शक्ती’चा बनाव
पीडितेची आणि अशोक खरातची ओळख २०१९ मध्ये तिच्या मेव्हण्यामार्फत नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात झाली होती. त्यावेळी खरातने “मला दैवी शक्ती प्राप्त असून, मी तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो; तुझे लग्न अत्यंत श्रीमंत घराण्यात होईल आणि तुझे करिअर सुधारेल,” असा दावा करून पीडितेचा विश्वास संपादन केला. २०२१ मध्ये पीडितेचा एक साखरपुडा मोडल्यानंतर खरातने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्याने पीडितेकडून ५० हजार रुपये उकळले आणि ‘सिद्ध’ केलेला ‘पुष्कराज’ खडा गळ्यात घालण्यास सांगितले. योगायोगाने पीडितेचे लग्न जमल्यानंतर खरातने हा आपलाच चमत्कार असल्याचे भासवले.
प्रसादातून गुंगी आणि ‘पवित्र’ करण्याच्या नावाखाली नराधम कृत्य
नोव्हेंबर २०२२ मध्ये पीडिता काही विधींच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी खरातच्या कार्यालयात एकटी गेली असताना या नराधमाने आपली खरी वृत्ती दाखवली. खरातने तिला चेंबरमध्ये बोलावून प्रसादाच्या नावाखाली पेढा दिला आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजले. त्या पेयातील गुंगीकारक पदार्थामुळे पीडितेचे डोके जड होऊन तिला ग्लानी आली. याच स्थितीचा फायदा घेत खरातने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिला भयानक धार्मिक भीती घातली.
“तू जर माझी प्रेयसी बनून राहिली नाहीस, तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा पती मृत्युमुखी पडेल. मी तुला शारीरिक संबंधातून एक प्रकारे ‘पवित्र’ करीत आहे,” असे निर्लज्ज विधान करून त्याने पीडितेवर मानसिक दबाव टाकला.
विवाहानंतरही अत्याचाराचे सत्र सुरूच
पीडितेचे लग्न झाल्यानंतर जेव्हा ती पतीसोबत आशीर्वाद घेण्यासाठी खरातच्या कार्यालयात गेली, तेव्हाही त्याने आपली वासनांध वृत्ती सोडली नाही. पतीला चेंबरबाहेर बसवून त्याने पुन्हा पीडितेवर अत्याचार केले. “विधी पूर्ण न केल्यास तुझे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होईल,” अशी धमकी देऊन त्याने पीडितेला वारंवार आपल्या जाळ्यात ओढले. शारीरिक इजा आणि रक्तस्त्राव होईपर्यंत त्याने पीडितेचा छळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
उच्चभ्रूंचे आश्रयस्थान आणि आता पोलिसांचा फास
अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्याचा दावा करत असे, ज्यामुळे राजकीय नेते, सनदी अधिकारी आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असत. मात्र, या ग्लॅमरस प्रतिमेच्या आड तो महिलांचे शोषण करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नाशिक पोलिसांनी त्याच्या फार्म हाऊसवरून शस्त्रे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, एसआयटीच्या (SIT) माध्यमातून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.










