Home / देश-विदेश / Iran-US-Israel War: होर्मुज 48 तासांत खुले करा! अन्यथा ऊर्जा केंद्र उडवू ! ट्रम्पची धमकी! इराणही संतप्त! आम्ही पाणी प्रकल्प नष्ट करू

Iran-US-Israel War: होर्मुज 48 तासांत खुले करा! अन्यथा ऊर्जा केंद्र उडवू ! ट्रम्पची धमकी! इराणही संतप्त! आम्ही पाणी प्रकल्प नष्ट करू

Iran-US-Israel War :: इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने छेडलेल्या युद्धाला 23 दिवस उलटून गेले तरी इराण माघार घेत नाही हे...

By: Team Navakal
Donald Trump
Social + WhatsApp CTA

Iran-US-Israel War :: इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने छेडलेल्या युद्धाला 23 दिवस उलटून गेले तरी इराण माघार घेत नाही हे पाहून अस्वस्थ झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनी जलमार्ग खुला करण्यासाठी इराणला 48 तासांची अंतिम मुदत दिली.  48 तासांत होर्मुज खुले केले नाही तर इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले करून ती उद्ध्वस्त करून टाकू, अशी शेवटची धमकीच ट्रम्प यांनी दिली. मात्र या धमकीला अजिबात भीक न घालता इराणने अमेरिकेलाच असा सज्जड इशारा दिला की, आमच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले झाल्यास आम्ही आखातातील अमेरिकेच्या मित्र देशांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले करू. त्यामुळे तेलाच्या अडवणुकीवरून चिघळलेले आखाती युद्ध पाणी तोडण्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.


काल इराणने इस्रायलच्या दक्षिण भागांत क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये इस्रायलच्या  गुप्त अणु केंद्राचा समावेश होता. या हल्ल्यात शंभरहून अधिक लोक जखमी झाले. युध्द सुरू झाल्यापासून इराणकडून इस्रायलवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला ठरला. इराणच्या या हल्ल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी ही पोस्ट केली. भारतीय वेळेनुसार पहाटे आपल्या मालकीच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, इराणने 48 तासांच्या आत होर्मुजची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त करेल आणि याची सुरुवात सर्वात मोठ्या प्रकल्पापासून होईल.
विशेष म्हणजे, अमेरिकेने इराणच्या वीज पायाभूत सुविधांविषयी माहितीही मिळवली आहे. या माहितीनुसार, इराणमध्ये अंदाजे 110 गॅस-आधारित वीज प्रकल्प आहेत, यातील तीन सर्वात मोठे प्रकल्प आहेत.  दमावंद कंबाईन्ड सायकल पॉवर प्लांट तेहरानच्या आग्नेयेला सुमारे 70 किमी अंतरावर असून, त्याची क्षमता 2,868 मेगावॅट आहे. दुसरा शहीद सलीमी पॉवर प्लांट माझंदरान प्रांतात कॅस्पियन समुद्राजवळ असून तिथे 2,215 मेगावॅट वीजनिर्मिती होते. तर तेहरानच्या ईशान्येला सुमारे 110 किमी अंतरावरील शहीद रझाई पॉवर प्लांटमध्ये 2,043 मेगावॅट वीज तयार होते. तर बुशेहर प्रकल्प हा इराणमधील एकमेव अणुऊर्जा   प्रकल्प आहे.  या सगळ्या ऊर्जा प्रकल्पांना अमेरिका लक्ष्य करू शकते.


ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने त्याला तेवढेच आक्रमक उत्तर दिले. इराणच्या खातम अल-अनबिया सेंट्रल कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फाघारी म्हणाले की, इराण अमेरिका आणि इस्त्रायलशी संबंधित समुद्राचे पाणी गोडे करणार्‍या प्रकल्पांवर (डिसेलिनेशन प्लांट) आणि आयटी पायाभूत सुविधांवर हल्ले करेल. इराणने अमेरिकेला दिलेले हे प्रत्युत्तर आखाती देशांना हादरवणारे आहे. कारण तेलसंपन्न असलेल्या आखाती देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड कमतरता आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या देशांची मदार मुख्यत्वे समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य बनवणार्‍या जल शुद्धीकरण प्रकल्पांवर आहे. सौदी अरेबियाला होणार्‍या एकूण पाणी पुरवठ्यापैकी 70 टक्के पाणी हे शुद्धीकरण प्रकल्पांमधून येते. इराणने याच प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यामुळे आखाती देशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर जर इराणने हल्ले केले तर आखाती देशात पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट
ओढवू शकते.


एका बाजूला इराणने अमेरिकेवर असा पलटवार केला असला तरी असेही स्पष्ट केले की, परदेशी जहाजे इराणच्या परवानगीने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून प्रवास करू शकतात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील इराणचे प्रतिनिधी अली मौसवी म्हणाले की,  होर्मुजची सामुद्रधुनी केवळ इराणच्या शत्रू राष्ट्रांसाठीच बंद आहे.  इराणच्या शत्रूशी ज्यांचा संबंध नाही, त्यांची जहाजे इराणशी सुरक्षेचा समन्वय साधून होर्मुज सामुद्रधुनीतून प्रवास करू शकतात. होर्मुजच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीसाठी अमेरिका आणि इस्रायलच जबाबदार आहेत.


एकूणच मध्य पूर्वेत सुरू असलेल्या या युध्दाच्या झळा संपूर्ण जगाला बसू लागल्या आहेत. युध्द जास्त लांबणे कोणालाही नको आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्यामुळे जेवढा त्रास होईल त्यापेक्षा कितीतरी पट भीषण संकट पाण्याचा पुरवठा थांबल्याने ओढवेल. कारण पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. त्यामुळे  या युध्दाचा शेवट कधी आणि कसा होतो, याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे.

भारतात आणखी
एक जहाज आले

एलपीजी घेऊन येणारे आणखी एक जहाज आज कर्नाटकातील मंगळूर येथील नवीन मंगळूर बंदरात दाखल झाले. अमेरिकेतून आलेल्या या जहाजात 16,714 टन एलपीजी आहे. ’पायक्सिस पायनियर’ नावाचे हे जहाज टेक्सास येथून निघाले होते. कालच या बंदरात 1.1 लाख टन कच्चे तेल घेऊन अ‍ॅक्वा टायटन हे जहाज याच बंदरात पोहोचले होते.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या