Sambit Patra on Rahul Gandhi : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परदेश प्रवासांबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. राहुल गांधी हे गेल्या २२ वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असून, या काळात त्यांनी ५० हून अधिक वेळा परदेश दौरे केल्याचे पात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत नमूद केले. या दौऱ्यांच्या पारदर्शकतेवर बोट ठेवत पात्रा यांनी काँग्रेस नेत्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
२२ वर्षांच्या कारकिर्दीत ५४ परदेश दौरे-
संबित पात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी आपल्या २२ वर्षांच्या राजकीय प्रवासात अंदाजे ५४ वेळा परदेशांत भ्रमंती केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, युनायटेड किंगडम (ब्रिटन), इटली, जर्मनी, व्हिएतनाम, कंबोडिया, सिंगापूर, बहरीन, मालदीव, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या राष्ट्रांचा समावेश आहे. पात्रा यांनी असाही दावा केला की, ३ मे २०२६ रोजी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या काही चित्रफितींनुसार (फूटेज), राहुल गांधी यांनी मस्कत आणि ओमान या देशांनाही अघोषित भेटी दिल्या होत्या.
गोपनीयता आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन?
या पत्रकार परिषदेत संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यांमधील गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, जरी अनेक प्रवासांच्या नोंदी सार्वजनिकरीत्या उपलब्ध असल्या, तरी त्यासाठी वापरण्यात आलेल्या निधीचा स्रोत मात्र स्पष्ट नाही. राहुल गांधी यांनी अनेकदा सरकारी परवानगी न घेता आणि विशेष सुरक्षा दलाला (SPG) विश्वासात न घेता प्रवास केल्याचा आरोपही त्यांनी केला. “राहुल गांधी गुप्त दौऱ्यांवर जातात का? त्यांना परदेशी संस्थांकडून आर्थिक रसद मिळते का? आणि त्यांनी या प्रवासांचे नेमके तपशील का लपवले आहेत?” असे बोचरे प्रश्न पात्रा यांनी विचारले आहेत.
राजकीय संघर्षाला नवे वळण-
संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या परदेश प्रवासाबाबत पारदर्शकता राखणे अपेक्षित असते, असे सांगत पात्रा यांनी राहुल गांधींच्या या कृतीला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानले आहे. संसदीय नोंदी आणि छायाचित्रांचे पुरावे असतानाही काही दौरे अघोषित का ठेवले गेले, असा संशय भाजप नेत्याने व्यक्त केला आहे. आगामी काळात या दौऱ्यांच्या निधीवरून आणि परदेशी संस्थांशी असलेल्या कथित संबंधांवरून भाजप अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत असून, या प्रकरणाने राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.









