Home / महाराष्ट्र / Crime News : वडिलांशी वादातून अमानुष कृत्य; चिमुकल्या मुलाला उचलून आपटले

Crime News : वडिलांशी वादातून अमानुष कृत्य; चिमुकल्या मुलाला उचलून आपटले

Crime News : पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिमुकल्या...

By: Team Navakal
Crime News :
Social + WhatsApp CTA

Crime News : पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिमुकल्या मुलाच्या वडिलांच्या एका जुन्या वादाचा सूड उगवण्यासाठी एका नराधम रिक्षाचालकाने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या बालकाला उचलून जमिनीवर आपटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अमानुष मारहाणीत बालक गंभीर जखमी झाले असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वसई पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अधिकच्या माहितीनुसार, वसई न्यायालयाच्या परिसरातील ‘अनुपम घर संकुल’ या निवासी संकुलात अतुल कोंढारे आपल्या पत्नी आणि साडेतीन वर्षांच्या विघ्नेशश वास्तव्यास आहेत. काल संध्याकाळी ८ च्या सुमारास चिमुकला विघ्नेश आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत इमारतीच्या आवारात खेळत होता. खेळता खेळता तो आवारात उभ्या असलेल्या एका रिक्षामध्ये जाऊन बसला. मात्र, हे साधे बालपण एका भयाण संकटात रूपांतरित होईल, याची कल्पना कोणालाही नव्हती.

त्याच वेळी संकुलात राहणारा रिक्षाचालक संदीप पवार तिथे पोहोचला. विघ्नेशला रिक्षात बसलेले पाहताच त्याच्यातील सैतान जागा झाला. त्याने विघ्नेशला क्रूरपणे पकडून त्याचे डोके रिक्षाच्या मीटरजवळील लोखंडी अँगलवर जोराने आदळले. एवढ्यावरच न थांबता, त्याने त्या निरागस बालकाला पाय धरून रिक्षातून बाहेर खेचले आणि हवेत भिरकावत डोक्याच्या बाजूने जमिनीवर आपटले. या नराधमाने बालकाला पाय धरून फरफटत नेले आणि पहिल्या मजल्यावरील पायऱ्यांकडे नेऊन पुन्हा मारहाण केली. नातवाला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या आजीलाही या नराधमाने जुमानले नाही आणि त्यांनाही मारहाण केली. हे सर्व थरकाप उडवणारे दृश्य सोसायटीच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

वसई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी संदीप पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला तात्काळ अटक केली आहे. वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार याचे विघ्नेशच्या वडिलांशी काही कारणावरून जुने वाद होते. याच वादाचा राग मनात धरून त्याने हे संतापजनक कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या