Akola Viral Video : कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या महिला आरोपीकडे कर्तव्यावर असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने (ASI) तिच्या मुलीला शरीरसुखासाठी पाठवण्याची निर्लज्ज मागणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलीस कोठडीतही महिला सुरक्षित आहेत का? असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. यादरम्यान, तेथे तैनात असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आपली पदे आणि वर्दीची प्रतिष्ठा विसरून या महिलेला विचारले “तुझ्या मुलीला शरीरसुखासाठी माझ्याकडे पाठव, त्या बदल्यात मी तुला १० हजार रुपये देईन,” असे अश्लील आमिष त्याने दाखवल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या धक्कादायक प्रसंगानंतर संबंधित महिलेने हिंमत एकवटून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या कृत्याची लेखी तक्रार केली.
तक्रारीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस प्रशासनाने तातडीने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासात संबंधित उपनिरीक्षकावर झालेले आरोप प्रथमदर्शनी खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विलंब न लावता या नराधम पोलीस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील एक चित्रफित (Video) सध्या सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत असून, त्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित दोषी उपनिरीक्षकाला कडक शब्दांत जाब विचारताना दिसत आहेत. “वर्दीची किमान लाज तरी बाळगायची होतीस,” अशा शब्दांत त्याला फटकारण्यात येत असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे उमटले आहे.










