Donald Trump NATO Threat: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नाटो’ (NATO) या लष्करी संघटनेतून बाहेर पडण्यावर गांभीर्याने विचार करत असल्याचे जाहीर केले आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात नाटो सदस्य देशांनी लष्करी मदत देण्यास स्पष्ट नकार दिल्याने ट्रम्प यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
ट्रम्प यांनी नाटोला ‘कागदी वाघ’ संबोधले असून, अमेरिका या संघटनेतून बाहेर पडल्यास त्याचे जागतिक स्तरावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.
अमेरिका बाहेर पडल्यास ‘नाटो’वर काय परिणाम होईल?
1. लष्करी ताकद कमकुवत होणार: नाटोच्या एकूण लष्करी खर्चापैकी ६९% हिस्सा (सुमारे ८११ अब्ज डॉलर्स) एकटा अमेरिका उचलतो. अमेरिका बाहेर पडल्यास उर्वरित २९ देशांना हा खर्च पेलणे कठीण होईल. इंटेलिजन्स, सॅटेलाईट डेटा आणि मिसाईल डिफेन्स या बाबतीत नाटो पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून आहे. अमेरिकेविना नाटोची लष्करी शक्ती अत्यंत क्षीण होईल.
2. शस्त्रास्त्रांचा तुटवडा: नाटोच्या ३१ देशांकडे असलेली ६०% शस्त्रास्त्रे ही अमेरिकेकडून येतात. तसेच, लिक्विड पेट्रोलिंग गॅसचा ५५ ते ६०% पुरवठाही अमेरिकाच करतो. अमेरिकेने सहकार्य काढल्यास या देशांसमोर मोठे ऊर्जा आणि सुरक्षा संकट उभे राहील.
3. रशिया आणि चीनचे वर्चस्व वाढणार: अमेरिका बाहेर पडल्यास युरोपीय देशांना स्वतःच्या संरक्षणासाठी मोठी फौज उभी करावी लागेल. अशा परिस्थितीत अनेक देश अमेरिकेची साथ सोडून रशिया आणि चीनच्या जवळ जाऊ शकतात. यामुळे अमेरिकेचे जागतिक स्तरावरील नियंत्रण कमी होईल.
4. नवीन ‘वर्ल्ड ऑर्डर’चा जन्म: जर अमेरिका नाटो आणि संयुक्त राष्ट्रातून (UN) बाहेर पडला, तर भारत, चीन आणि युरोपीय संघ (EU) मिळून एक नवीन जागतिक व्यवस्था तयार करू शकतात. भारत आधीच ‘साउथ ग्लोबल’चा आवाज बनला असून, कॅनडा आणि फ्रान्ससारखे देश नवीन जागतिक रचनेसाठी भारताच्या बाजूने उभे राहू शकतात.
5. ‘इस्लामिक नाटो’ची भीती: पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की मिळून एक ‘इस्लामी नाटो’ बनवण्याची शक्यता आहे. ही नवीन रणनीती अमेरिकेच्या पाश्चात्य प्रभावाला मोठे आव्हान ठरू शकते.
इराण युद्धाचा परिणाम
२८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू असलेल्या इराण युद्धामुळे आधीच जागतिक ऊर्जा संकट गडद झाले आहे. इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद केल्यामुळे भारतातही इंधन आणि गॅसचे दर वाढले आहेत. अशा तणावाच्या परिस्थितीत अमेरिकेने नाटोची साथ सोडल्यास जागतिक शांतता आणि व्यापारावर त्याचे विपरीत परिणाम होतील.











