Sanjay Raut : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यातील प्रखर राजकीय व्यक्तिमत्त्वामागे दडलेला एक संवेदनशील कलाकार आणि दिलदार माणूस नुकताच जळगाव दौऱ्यादरम्यान सर्वांना पाहायला मिळाला. राजकारणातील संघर्षाच्या पलीकडे जाऊन एका सामान्य कलाकाराच्या श्रमाचा सन्मान करत, राऊत यांनी एका वृद्ध शिल्पकाराकडून ‘सर्जा-राजा’ या बैलजोडीची कलाकृती विकत घेऊन त्यांना मायेचा आधार दिला.
जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात वृद्ध शिल्पकार शिरूभाऊ कासार हे सकाळपासूनच खासदार राऊत यांच्या भेटीची प्रतीक्षा करत थांबले होते. कासार यांनी लाकूड आणि सिरॅमिक पावडरच्या साहाय्याने अत्यंत देखणी अशी बैलजोडीची प्रतिकृती साकारली होती. राऊत जेव्हा विश्रामगृहातून आपल्या पुढील प्रवासासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांची नजर हातातील कलाकृती घेऊन उभ्या असलेल्या कासार यांच्यावर पडली. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून राऊत गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी मोठ्या आत्मीयतेने वृद्ध शिल्पकाराची विचारपूस केली.
संवाद सुरू असताना राऊत यांनी त्या देखण्या कलाकृतीचे कौतुक केले आणि तिची किंमत विचारली. शिरूभाऊ कासार यांनी या बैलजोडीचे मूल्य साडेआठ हजार रुपये असल्याचे सांगितले. मात्र, समोरच्या व्यक्तीची आत्मीयता पाहून त्यांनी “तुम्ही पाचशे रुपये कमी द्या” असे म्हणत स्वतःहून सवलत देऊ केली. त्यावर कोणतीही घासाघिस न करता, राऊत यांनी तत्काळ आपल्या खिशातून ५०० रुपयांच्या नोटांचा बंडल काढला आणि पूर्ण आठ हजार रुपये मोजून ती प्रतिमा सन्मानाने खरेदी केली. एका लोकप्रतिनिधीने दाखवलेली ही तत्परता पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण अवाक झाले.
ही कलाकृती केवळ लाकडाचा तुकडा नव्हती, तर त्यात कासार यांनी सिरॅमिक पावडरचा वापर करून बैलांच्या आकृत्या अत्यंत जिवंतपणे कोरल्या होत्या. आपली कलाकृती योग्य हातात गेल्याचे पाहून शिरूभाऊ कासार यांच्या चेहऱ्यावर कृतकृत्यतेचे भाव उमटले.










